सातार्‍यातील ऐतिहासिक वास्तूंचा परिसर ‘फलक प्रतिबंधित क्षेत्र’

सातारा, १५ ऑगस्ट (वार्ता.) – सातारा शहरातील ऐतिहासिक वास्तूंचा परिसर ‘फलक प्रतिबंधित क्षेत्र’ (नो फ्लेक्स झोन) आणि फेरीवाले प्रतिबंधित क्षेत्र (नो हॉकर्स झोन) म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सातारा नगरपालिकेच्या प्रशासकीय सभेमध्ये हा विषय संमत करण्यात आला. तसेच सातारा शहर आणि सीमावाढ झालेल्या भागातील रस्त्यांची दुरुस्ती, नवीन पथदीप बसवण्यासह पथदिव्यांचे ‘डिजिटल मॉनिटरिंग’, पवई नाका येथे ‘शिवतीर्थ’ नावाचा फलक लावणे, यांसह २८८ विषयांना संमती देण्यात आली.


सातारा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये १२ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ४ वाजता मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या सभेला विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. शहर विकास आणि कार्योत्तर संमतीचे २९० विषय सभेत मांडण्यात आले.

या वेळी कास तलाव परिसराचा विकास करणे, ‘माझी वसुंधरा अभियानां’तर्गत शहरात १५० किलोवॅट क्षमतेचा सोलर संच उभारणे, शहर आणि सीमावाढ भागात नवीन पथदीप बसवणे, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी शहरात ठिकठिकाणी बाकडी (बेंच) बसवणे, जकातवाडी येथे जलपडताळणी प्रयोगशाळा चालू करणे, नगरपालिकेत हीरकणी कक्ष स्थापन करणे, शाहू कलामंदिर येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, शहरातील बंद सिग्नल यंत्रणा चालू करणे, शहरात ग्रॅनाईटचे दिशादर्शक फलक बसवणे, नवीन गटारांची निर्मिती करणे, आदी विषय समाविष्ट करण्यात आले.