बाह्यवळण रस्ता कामांची मान्यता जिल्हाधिकार्‍यांची अनुमती न घेता दिली

  • ‘श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखडा’

  • सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार !

श्री क्षेत्र जेजुरी

पुणे, १५ ऑगस्ट (वार्ता.) – पुरंदर तालुक्यातील ‘श्री खंडोबा देवस्थान’ आणि जेजुरी शहर विकासासाठी राज्यशासनाने ३४९ कोटी ४५ लाख रुपयांच्या ‘श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’स संमती दिली आहे. अतीमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी १० कोटी ६८ लाख ७५ सहस्र रुपयांच्या बाह्यवळण रस्त्यांसाठी संमती दिली आहे. त्याला शिखर समितीनेही मान्यता देऊन नियोजन विभागाने आदेश प्रसिद्ध केला; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी परस्पर निविदा प्रक्रिया राबवली. प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यास मान्यता देतांना ‘जिल्हा विकास आराखडा समिती’चे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची अनुमती घेतली नाही. हे समोर आल्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी निविदा प्रक्रिया थांबवण्याचे आदेश पत्राद्वारे दिल्याचे समोर येत आहे.

कार्यकारी समितीची पुन्हा बैठक घेऊन नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी. निविदा संमतीनंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात यावा, असेही पत्रकांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

‘श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’चे काम ३ टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १०९ कोटी ५७ लाख रुपयांची कामे होणार आहेत. मंदिर, संपूर्ण तटभिंतीचे जतन आणि दुरुस्ती यांसाठी ११ कोटी २३ लाख, दीपमाळांचे जतन आणि दुरुस्ती यांसाठी ११ कोटी २५ लाख, उत्तर-पूर्व आणि पश्चिमेकडील पायर्‍या, १३ कमानी, साहाय्यक संरचना जतन आणि दुरुस्ती यांसाठी १२ कोटी २२ लाख, ऐतिहासिक होळकर आणि पेशवे तलाव, इतर जलकुंडांचे जतन आणि दुरुस्ती यांसाठी १२ कोटी ५६ लाख, श्री मल्हार गौतमेश्वर मंदिर, श्री लवथळेश्वर आणि श्री बल्लाळेश्वर मंदिरांचे जतन आणि दुरुस्ती यांसाठी २ कोटी २ लाख, कडेपठार मंदिर २ पायरी मार्गांचे जतन आणि दुरुस्ती यांसाठी १० कोटी ७३ लाख अशी तरतूद करण्यात आली आहे.