हडपसर (जिल्हा पुणे) येथे वाहतूक पोलिसाला लाथ मारणार्‍याला अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

हडपसर (जिल्हा पुणे) – वाहतूक नियमन करणार्‍या पोलीस कर्मचार्‍याच्या पोटात लाथ मारल्याप्रकरणी हांडेवाडी येथील मारुति माने या चारचाकी चालकाला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी अन्य एका चालकाच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत हांडेवाडी वाहतूक विभागातील पोलीस शिपाई अजिंक्य नानगुडे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

पोलीस शिपाई नानगुडे हांडेवाडी परिसरात वाहतूक नियमन करत होते. त्या वेळी हांडेवाडी भागात वाहतूककोंडी झाली होती. चारचाकीचालक मारुति माने यांनी त्यातूनच मोटार नेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी नानगुडे यांनी त्याला चारचाकी थांबवण्यास सांगितल्यावर माने आणि मोटारीतील साथीदार पाटकर यांनी नानगुडे यांना शिवीगाळ केली. नानगुडे यांनी कारवाई करण्यास प्रारंभ केल्याने माने यांनी नानगुडे यांच्या पोटात लाथ मारली, तसेच कठीण वस्तू त्यांच्या हातावर मारली. त्या वेळी तेथे असलेल्या एका चारचाकी चालकाने नानगुडे यांना शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा आणल्याने, तसेच मारहाण केल्याने चारचाकीचालक माने यांना अटक करण्यात आली. (वाहतूक पोलिसांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देत नाहीत का ? वाहतूक पोलिसांसह अन्य पोलिसांवरही आक्रमणे होणे, यातून पोलीस व्यवस्थेचा धाक संपला आहे, असे लक्षात येते. – संपादक)