मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्रामुळे राज्यातील सहस्रावधी नागरिकांना लाभ !

मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्र

मुंबई, १५ ऑगस्ट (वार्ता.) – राज्याचे मंत्री आणि राज्यशासनाचे विविध विभाग यांना स्वत:च्या समस्या निवेदनाद्वारे देण्यासाठी मंत्रालयात नियमित सहस्रावधी नागरिक येतात. यांतील बहुतांश जणांना कोणता विभाग कोणत्या मजल्यावर आहे, तसेच मंत्र्यांचे दालन कुठे आहे, याची माहिती नसते. ते शोधण्यात नागरिकांचा वेळ वाया जातो. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मध्यवर्ती टपाल केंद्र चालू केल्यामुळे सर्व मंत्री, अधिकारी आणि सर्व विभाग यांच्याशी संबंधित पत्रव्यवहार या केंद्रामध्ये करता येऊ लागला आहे. मंत्रालयात नियमित कागदपत्रे देण्यासाठी येणार्‍या सहस्रावधी सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ होत आहे.

या मध्यवर्ती टपाल केंद्रामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह सर्व विभागांची टपाले एकाच ठिकाणी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० या वेळेत स्वीकारली जातात.

विशेष म्हणजे या केंद्रामध्ये देण्यात आलेल्या प्रत्येक टपालाची नोंद नोंदणीवहीत करून त्याला क्रमांक दिला जातो आणि त्याच दिवशी ते टपाल संबंधित विभागाच्या नोंदणी शाखेकडे ‘स्कॅन’ करून हस्तांतरित केले जाते. या केंद्रामध्ये नियमित १ सहस्र ५०० ते २ सहस्र टपाले जमा होतात. मंत्रालयातील सर्व विभागांतील मिळून एकूण ८० कर्मचारी आणि २ अधिकारी या केंद्रामध्ये कार्यरत आहेत. नागरिकांसाठी येथे सरबताची व्यवस्थाही करण्यात आली आहे. नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी नियमित १०० पेक्षा अधिक टपाले ‘ई-ऑफिस’ करणार्‍या कर्मचार्‍यांची नावे फलकावर प्रसिद्ध करून त्यांना प्रोत्साहित केले जाते.

नागरिकांचा वेळ वाचत आहे !

यापूर्वी टपाल मंत्रालयाच्या आतमध्ये जमा करावे लागत असल्यामुळे नागरिकांना प्रवेशपास काढून मंत्रालयात जावे लागत होते. या ठिकाणी मोठी गर्दी असल्यास रांगेतच १ घंट्याहून अधिक वेळ जात होता, तसेच मंत्रालयात दुपारी १२ नंतर प्रवेश मिळत असल्यामुळे नागरिकांना टपाल जमा करण्यासाठी तोपर्यंत थांबून रहावे लागत होते. मध्यवर्ती टपाल केंद्रामुळे नागरिकांचा वेळ वाचत आहे. यामुळे प्रशासनाच्या व्यवस्थापनातही सुधारणा होत आहे.

स्वत:चे टपाल कुठे आहे ? हे पहाण्यासाठी नागरिकांना संगणकांची व्यवस्था !

नागरिकांनी या मध्यवर्धी टपाल केंद्रामध्ये दिलेले निवेदन कार्यवाहीसाठी कोणत्या विभागात आणि कुठल्या डेस्कवर आहे, हे पहाण्यासाठी या ठिकाणी २ संगणक ठेवण्यात आले आहेत. यामध्ये टपालाचा क्रमांक लिहिल्यानंतर ते टपाल कार्यवाहीसाठी कुठे आहे, याची माहिती नागरिकांना संगणकावर पहाता येते.