बांगलादेशात झालेली उलथापालथ भारतालाच नव्हे, तर प्रत्येक सूज्ञ, विवेकी व्यक्तीला चिंतित करणारी आणि धोक्याची चेतावणी देणारी आहे. जे काही घडले, तो विद्यार्थ्यांचा अचानक झालेला उठाव नसून थंड डोक्याने नियोजन करून घडवण्यात आलेला घातपात आहे, हे समजून घेतल्याविना या घटनांचे गांभीर्य लक्षात येणार नाही. जागतिक वर्चस्वाची आसुरी महत्त्वाकांक्षा असलेल्या ३ शक्ती आज जगात संघर्ष आणि अराजक यांचे थैमान घालत आहेत, ज्यामुळे जग आज तिसर्या महायुद्धाच्या आणि संपूर्ण विध्वंसाच्या टोकावर येऊन उभे आहे.
१. स्वतःच्या मर्जीची सरकारे आणि त्यांच्याद्वारे जगात हवे तसे उलथापालथ करू पहाणारे ‘डीप स्टेट’ !
यातील पहिली शक्ती, म्हणजे सर्वशक्तीमान बँका आणि अतीश्रीमंत घराणी यांची ‘डीप स्टेट.’ (‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांच्या गुप्त जाळ्यांचा संदर्भ देते जी कुणासही उत्तरदायी न रहाता सरकारी धोरणावर प्रभाव टाकते.) अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ५ ‘अँग्लोफाईल’ देशांमध्ये स्वतःच्या मर्जीची सरकारे असावीत आणि त्यांच्याद्वारे संपूर्ण जगात आपण आपल्याला हवी तशी उलथापालथ अन् पालट घडवावेत, अशी त्यांची योजना असते. यात सर्वांत मोठा वाटा अर्थातच अमेरिकेचा असतो. म्हणूनच ‘डीप स्टेट’च्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून त्यांच्या नियंत्रणात न रहाणारे डोनाल्ड ट्रंप जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हा त्यांना मोठाच धक्का बसला. त्यानंतर कुठलाही धोका न पत्करता ‘आपल्याला हवे तेच घडले पाहिजे’, यासाठी त्यांचे प्रयत्न त्यांनी अधिकच तीव्र केले. अमेरिकेतील ‘ट्रायलॅटरल कमिशन’, ’कौन्सिल फॉर फॉरेन रिलेशन्स’, ‘बिल्डरबर्ग ग्रुप’ यांसारख्या ‘थिंक टँक्स’द्वारे (वैचारिक गटाद्वारे) ते जगात मोठ्या उलथापालथी घडवत असतात. ‘जगातील सर्व देशांमध्ये ‘होयबा’ सरकारे असावीत आणि त्यांनी आपल्याला हवी तीच आर्थिक अन् राजकीय धोरणे राबवावीत’, असा त्यांचा आग्रह असतो. देशाचा आत्मसन्मान आणि देशहिताला प्राधान्य देऊन धोरणे आखण्याचे स्वातंत्र्य जपणारी राष्ट्र त्यांच्या डोळ्यात काट्यासारखी खुपतात. म्हणून तर ‘डीप स्टेट’चे एक मुखंड (प्रमुख) जॉर्ज सोरोस यांनी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या बैठकीत जाहीरपणे सांगितले होते, ‘भारतातील मोदींचे सरकार पाडण्यासाठी त्यांनी १ बिलियन डॉलर्सचा फंड राखून ठेवला आहे.’ इतर देशांच्या कारभारात किती बिनदिक्कतपणे आणि राजरोसपणे हे ढवळाढवळ करू शकतात, हेच यावरून लक्षात येते.
२. जागतिक वर्चस्वाचे उद्दिष्ट ठेवून विध्वंसक कार्य करणारे जिहादी आणि नवमार्क्सवाद !
जागतिक वर्चस्वाची महत्त्वाकांक्षा असणार्या इतर २ शक्ती, म्हणजे जिहादी इस्लाम आणि ‘वोकिझम’च्या नावाने जगाला वाळवीसारखे पोखरणारा ‘कल्चरल मार्क्सिझम’ किंवा नवमार्क्सवाद. (वोकिझम म्हणजे जगभरात प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांना छेद देणारी विकृती !) या तिन्ही शक्तींच्या विचारधारा आणि मूल्ये यांत टोकाचा विरोध असला, तरीही जागतिक वर्चस्वाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या एकमेकांचा वापर करू बघत आहेत आणि म्हणून सध्या त्यांची एक महाआघाडी कार्यरत आहे. ‘सगळ्या राष्ट्रांनी आपली वेगळी ओळख विसरून मेंढरासारखे आपल्या मागे यावे’, हा उद्देश असल्यामुळे ‘राष्ट्राला स्वतःची ओळख ज्यातून मिळते, ती संस्कृती आणि देशप्रेम यांचा त्यांनी त्याग करावा’, असा या आघाडीचा प्रयत्न असतो. म्हणूनच ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ (वांशिक भेदभावाच्या विरोधातील एक आंदोलन) या आंदोलनाच्या निमित्ताने युरोप अमेरिका येथील ‘फाऊंडिंग फादर्स’चे (संस्थापकांचे) पुतळे आणि स्मारके उद्ध्वस्त केली गेली.
३. बांगलादेशात जिहाद्यांनी केलेले कृत्य म्हणजे वर्ष १९७१ चा सूड पूर्ण करणे होय !
बांगलादेशात शेख मुजिबुर रेहमान यांचा पुतळा असाच अपमानित केला गेला, हा योगायोग नक्कीच नाही. बांगलादेशाचा जन्मच मुळात बंगाली भाषा आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी झाला; कारण वर्ष १९७१ मध्ये हे सांस्कृतिक आकर्षण इस्लामच्या बंधुभावापेक्षा अधिक बलवान ठरले; म्हणूनच बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला. त्या चळवळीचे नेतृत्व करणारे शेख मुजिबुर यांचा पुतळा उद्ध्वस्त करून आणि त्यांच्या कन्या शेख हसीना यांना पदच्युत करत परागंदा होण्यास भाग पाडून जिहादी इस्लामने वर्ष १९७१ चा सूड पूर्ण केला आहे.
शेख मुजिबुर यांची हत्या केल्यानंतर लष्कर आणि त्यांच्या ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’सारख्या जिहादी विचारांच्या अनुयायांनी बांगलादेशाला जगातील सर्वाधिक गरीब राष्ट्रांच्या पंक्तीत आणून बसवले होते. त्या वेळी बांगलादेश हा इस्लामी आतंकवाद्यांचा अड्डा बनला होता. पुण्यासह भारतात झालेल्या अनेक बाँबस्फोटांची पाळेमुळे तेव्हा बांगलादेशपर्यंत पोचत होती.
४. बांगलादेशमध्ये अराजकता निर्माण करण्यामागे जागतिक वर्चस्ववाद कारणीभूत
वर्ष २००८ मध्ये बांगलादेशाची सूत्रे हाती आल्यानंतर शेख हसीना यांनी इस्लामी आतंकवाद्यांना नियंत्रणात ठेवले, भारताशी मैत्रीचे धोरण राखले आणि देशाला गरिबीतून बाहेर काढणारी धोरणे राबवली. विशेषतः वस्त्रोद्योगाच्या उत्पादनात आघाडी घेतली. याच कारखान्यांची आताच्या हिंसाचाराच्या वेळी जाळपोळ करण्यात आली, हाही योगायोग नाही. बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात ज्यांनी भाग घेतला, त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकर्यात दिले जाणारे आरक्षण या तात्कालिक मुद्यासाठी चालू झालेले आंदोलन इतकी प्रचंड उलथापालथ करण्याइतके भडकणे शक्यच नव्हते; कारण शेख हसीना यांच्या सरकारने वर्ष २०१९ मध्येच हे आरक्षण रहित केले होते. त्यानंतर न्यायालयाने ‘ते पुन्हा लागू करावे’, असा निर्णय दिला होता, म्हणजेच विद्यार्थ्यांचे आंदोलन सरकारविरुद्ध नव्हे, तर न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध होते. न्यायालयानेही नुकतेच एकूण आरक्षणातून ९३ टक्के आरक्षण रहित केले होते, म्हणजेच हा मुद्दा खरे तर संपल्यातच जमा होता. तरीही लाखो लोकांना ढाक्यात जमवून अराजक निर्माण करण्यात आले. यामागे जागतिक वर्चस्ववादी शक्तींची वेगवेगळी कारणे होती. भारताच्या भोवती असलेली पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, मालदीव ही राष्ट्रे चीनने पद्धतशीरपणे स्वतःच्या प्रभावाखाली आणली आहेत. बांगलादेशमध्येही चीनने भारतविरोधी भावना रुजवायला प्रारंभ केला होता. यात अडचणीचे ठरणारे आणि भारताशी मैत्री असणारे शेख हसीना यांचे सरकार हटवणे, हे त्यांचे भूराजकीय उद्दिष्ट होते.
५. अमेरिकेने बांगलादेशातील सरकार उलथवण्यामागील एक कारण
भारताला अस्थिर करणे, ही ‘डीप स्टेट’ची उघड भूमिका आहे, हे आपण वाचले. या व्यतिरिक्त ‘मणीपूर, मिझोराम येथे एक ख्रिस्ती राष्ट्र असावे’, हे अमेरिकेचे एक भूराजकीय उद्दिष्ट आहे. त्यासाठी बांगलादेशात भारतविरोधी सरकार असणे त्यांच्यासाठी सोयीचे आहे. म्हणूनच अनेक देशातील हुकूमशहांशी मधुर संबंध राखणार्या बायडेन यांनी शेख हसीना यांच्याविषयी मात्र ‘त्या लोकशाहीची हत्या करत आहेत’, हे कारण देऊन अत्यंत कठोर भूमिका घेतली.
६. साम्यवादी आणि जिहादी यांना हाताशी धरून ‘डीप स्टेट’ने बांगलादेशमध्ये राबवलेले षड्यंत्र
‘निधर्मी’ (सेक्युलर) भूमिका घेणार्या आणि भारताशी मैत्री राखणार्या शेख हसीना यांचे सरकार’, हा बांगलादेश पूर्णपणे जिहादी इस्लामच्या प्रभावाखाली जावा, ही इच्छा असलेल्या जिहाद्यांच्या मार्गातील मोठा अडथळा होता. शेख हसीना यांच्या पदच्युतीनंतर बांगलादेशात ‘जमात ए इस्लामी’ या आतंकवादी संघटनेचे महत्त्व पुष्कळच वाढले आहे. यामुळे तेथील हिंदूंच्या सुरक्षेला मोठाच धोका निर्माण झाला आहे. या तिन्ही शक्तींनी (‘डीप स्टेट’, जिहादी आणि नवमार्क्सवाद) आरक्षणविरोधी आंदोलनाचे निमित्त करून शेख हसीना सरकारचा फसवले गेले. त्यांचा मूळ उद्देश बांगलादेशने स्वतःची वेगळी ओळख आणि स्वतंत्र धोरणे सोडून देऊन वर्चस्ववादी शक्तींची धोरणे राबवावीत, हाच होता. अन्यथा बंगबंधू शेख मुजिबुर यांचा पुतळा पाडणे, वस्त्रोद्योगाच्या कारखान्यांची नासधूस करणे, यांचा आरक्षणाच्या प्रश्नांशी काहीच संबंध नव्हता.
साम्यवादी आणि जिहादी यांना हाताशी धरून वर्ष २०२४ मध्ये भारत अन् बांगलादेश येथे होणार्या निवडणुकांमध्ये तेथील राष्ट्रवादी सरकारे उलथवण्याची ‘डीप स्टेट’ची योजना होती. यानुसार पैसा आणि प्रचार यांचा मोठा पाठिंबा देत त्यांनी विरोधी पक्षांमागे उभा केला होता. हे साध्य न झाल्यामुळे काही ना काही कारणाने आंदोलने चालू करून अराजक आणि विध्वंस यांचे थैमान घालण्याची योजना आखण्यात आली आहे. ‘केजीबी’चे (रशियाचा गुप्तचर गटाचे नाव) वरिष्ठ अधिकारी युरी बेझमेनॉव्ह यांनी कधीच सांगून ठेवले आहे, ‘अशी विध्वंसक आंदोलने ही कधीही जनतेचे ‘उत्स्फूर्त उठाव’ नसतात. ती कडव्या साम्यवादी गटांनी योजनाबद्ध रितीने घडवलेले उठाव असतात.’ यात बांगलादेशच्या सरकारला हरवण्यात त्यांना यश आले आहे.
७. भारतियांचा सामना आता निरंकुशतावादी शक्तींशी…!
भारतातही हेच प्रयत्न होणार आहेत. राहुल गांधींनी निवडणूक प्रचाराच्या वेळी ‘देशमें आग लगने जा रही है’ (देश पेटणार आहे), असे विधान केले होते. आजही जातीजातींमध्ये संघर्ष भडकवण्याचे प्रयत्न चालूच आहेत. निवडणूक निकालानंतर योगेंद्र यादव यांनी ‘लोकशाहीचे रक्षण संसदेत नाही, तर रस्त्यावर होते. आता रस्त्यावर ‘रेझिस्टन्स मुव्हमेंटस्’ (प्रतिकाराची चळवळ) चालू व्हायला पाहिजेत’, असे वक्तव्य केले होते. त्याआधी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळातील ‘नॅशनल ॲडव्हायजरी कौन्सिल’चे (राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे) सदस्य हर्ष मंदेर यांनी ‘न्याय अब अदालतों में नहीं, सडकों पर होगा’ (न्यायालयात न्याय मिळत नाही, तो रस्त्यावर मिळतो), असे जाहीर विधान केले होते. ही विधाने हलक्यात घेऊन चालणार नाही. यासाठी जगात घडणार्या घटनांचे क्रम या विधानांशी जोडून अत्यंत सावध रहाण्याची आवश्यकता आहे. अचानक चालू होणार्या आणि भावनांना हात घालणार्या कुठल्याही आंदोलनामागचा मूळ हेतू ओळखून, डोकी जागेवर ठेवून देशहित नेमके कशात आहे, याचे भान राखणे आवश्यक आहे; कारण आपला (भारतियांची) सामना सर्वशक्तीमान अशा निरंकुशतावादी शक्तींशी आहे अन् आपल्या बाजूने फक्त आपणच आहोत !
लेखक : श्री. अभिजित जोग, ‘असत्यमेव जयते’ आणि ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकांचे लेखक, पुणे. (साभार : फेसबुक)