थोडक्यात . . .

३० रुपये रिक्शाचे भाडे देण्यावरून धर्मांधाने केली हत्या !

क्षुल्लक कारणामुळे जीव घेण्यापर्यंत जाणारे क्रूर धर्मांध !

मुंबई – रिक्शाचे भाडे देण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन सैफ जाहिद अली याने सहकारी छक्कन अली याची हत्या केली. रात्री मद्यधुंद स्थितीत ते दोघे धारावी ते कुर्ला येथे रिक्शाने प्रवास करत होते. भाडे देतांना सैफने छक्कनकडे ३० रुपयांची मागणी केली. नकार दिल्यावर सैफने त्याच्या कानशिलात लगावली. यामुळे छक्कन दगडावर आपटून बेशुद्ध पडून त्याचा मृत्यू झाला. पळून गेलेल्या सैफला पोलिसांनी कल्याण येथून अटक केली.


विनामूल्य शिकणार्‍या मुलींसाठी ‘हेल्पलाईन’

मुंबई – वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अल्प असलेल्या पालकांच्या मुलींना पदवी, पदविका आणि पदव्युत्तर पदवी शिक्षण विनामूल्य देण्यात येत आहे. यातील विद्यार्थिनींच्या अडचणी सोडवण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने ०७९६१ ३४४४०, ०७९६९ १३४४४१ हे ‘हेल्पलाईन’ क्रमांक, तसेच helpdesk.maharashtracet.org हे संकेतस्थळ चालू केले आहे. कार्यालयीन दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत या हेल्पलाईनचा उपयोग करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.


डॉ. नीलम गोर्‍हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा !

मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांना राज्यशासनाने कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. डॉ. नीलम गोर्‍हे या विधान परिषदेच्या सदस्या असून सध्या त्यांची निवडून येण्याची ही ४ थी वेळ आहे. वर्ष २०१९ पासून डॉ. नीलम गोर्‍हे विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.


पुणे येथे मनोज जरांगे यांच्या ‘शांतता रॅली’त चोरांचा उच्छाद !

रोख रक्कमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी

पुणे – येथे मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे यांची १२ ऑगस्ट या दिवशी शहरातून शांतता फेरी काढण्यात आली होती. या वेळी गर्दीचा अपलाभ घेऊन चोरांनी सोन्याचे दागिने, भ्रमणभाष, रोख रक्कम चोरल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरांनी वेगवेगळ्या घटनेत ९ लाख रुपयांचा मौल्यवान ऐवज चोरी करून नेल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी विश्रामबाग, स्वारगेट पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.


जुन्या निवृत्तीवेतनासाठी २९ ऑगस्टपासून बेमुदत संप !

मुंबई – वर्ष २०२४ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र शासनाने सुधारित निवृत्तीवेतन देण्याची घोषणा केली होती; मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. राज्यात जुने निवृत्तीवेतन लागू करावे, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघा’ने २९ ऑगस्टपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे.

राजपत्रित अधिकारी या संपात सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे यांनी १३ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.

महाराष्ट्रात शासकीय नोकरीतील निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे. सेवानिवृत्ती किंवा मृत्यू उपदानाची (ग्रॅज्युईटी) रक्कम २५ लाख रुपये इतकी करावी. शासनाच्या विविध खात्यांमधील रिक्त पदे भरावीत, अशी मागणीही या वेळी कुलथे यांनी केली आहे.