कणकवली – राज्यघटनेचा अमृत महोत्सव चालू असतांनाच काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी राज्यघटनेविषयी राजकारण चालू केले आहे. ‘राज्यघटना पालटणार’, असे खोटे सांगून समाजात विष पेरले जात आहे. काँग्रेसने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतःच्या लाभासाठी वापर केला आणि लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत, तसेच अन्य एका पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव केला. डॉ. बाबासाहेब यांचा जो अपमान काँग्रेसने केला आहे, त्याचा हिशोब करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन येथे झालेल्या ‘संविधान जागर सभेत’ सभेचे अध्यक्ष तथा बौद्ध युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय गवाळे केले.
‘संविधान जागर यात्रे’चे ११ ऑगस्टला कणकवलीत आगमन झाले. या वेळी यात्रेचे कणकवलीत स्वागत करण्यात आले. या वेळी झालेल्या सभेत व्यासपिठावर आमदार नितेश राणे, अधिवक्ता वाल्मीक निकाळजे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, उपाध्यक्ष अशोक कांबळे, जिल्हा सरचिटणीस सुशील कदम आदी उपस्थित होते.
या वेळी गवाळे म्हणाले, ‘‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राज्यघटनेत पालट करून हुकूमशाही कायदे केले; मात्र घटनेची मूळ चौकट कुणालाच मोडता येत नाही. जनता पक्षाचे सरकार आले, तेव्हा ४४ वी घटनादुरुस्ती करून इंदिरा गांधींनी केलेले कायदे रहित करण्यात आले. त्यामुळे काँग्रेसने हुकूमशाही आणि घटना पालटणार यावर बोलूच नये.’’
अधिवक्ता निकाळजे म्हणाले, ‘‘जगात गोबेल्सनीती रुजली आहे, त्याचा लाभ काँग्रेसचे राहुल गांधी यांनी घेऊन ‘राज्यघटना पालटणार’, असे म्हणत अपप्रचार केला. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये खरोखरच राज्यघटना पालटली जाणार कि काय ? असा संभ्रम निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत राज्यघटनेत पालट केला नाही आणि ते यापुढेही करणार नाहीत.’’
आमदार नितेश राणे या वेळी म्हणाले, ‘‘देश वाचवायचा असेल, तर शिवशक्ती आणि भीमशक्ती यांची एकजूट करूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की ‘राज्यघटना लिहितांना अधिक कष्ट पडले नाहीत; कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते. राज्यघटना पालटणार ही आवई उठवणार्यांना ‘संविधान जागर यात्रा’ ही चपराक आहे.’’