आगामी काळात कांदा निर्यातीत अडसर येणार नसल्याची कांदा निर्यातदारांना आशा

बांगलादेशातील अराजकाचा परिणाम !

नाशिक –  नाशिकच्या कांद्याचे ७० पेक्षा अधिक ट्रक प्रतिदिन बांगलादेशात जातात. सध्या बांगलादेशातील अराजकामुळे काही ट्रक सीमेवर अडकून पडले आहेत. ७ ऑगस्ट या दिवशी बांगलादेशात ५९ ट्रक गेले. कांदा निर्यातदार व्यापार्‍यांनी ही माहिती दिली. नाशिकमधून बांगलादेशात पाठवल्या जाणार्‍या कांद्यांपैकी आतापर्यंत ९० टक्क्यांपेक्षा अधिक माल बांगलादेशात गेला आहे. तेथील स्थिती वेगाने पूर्वपदावर येत असल्याने आगामी काळात बांगलादेशातील कांदा निर्यातीत अडसर येणार नाही, असा व्यापार्‍यांचा अंदाज आहे. बांगलादेशामध्ये भारताकडून सुमारे ७५ टक्के कृषीमाल आयात केला जातो.

२ दिवसांपूर्वी हे ट्रक भारत-बांगलादेशाच्या सीमेवर अडकून पडले होते. ही स्थिती दीर्घकाळ राहिली असती, तर कोलकत्यामध्येच मिळेल त्या दरात कांदा विकण्याची नामुष्की निर्यातदारांवर ओढावली असती. बांगलादेशात जाणार्‍या ५० सहस्र टन कांद्यापैकी सुमारे ८५ टक्के माल एकट्या नाशिक जिल्ह्यातून पाठवण्यात येतो. बांगलादेशातील अंतर्गत अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका कांदा निर्यातदारांना आणि अप्रत्यक्षपणे कांदा उत्पादकांना बसणार आहे.