डहाणू (पालघर) येथील आश्रमशाळांतील विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील रणकोळ, आंबेसरी आणि खंबाळे या आश्रमशाळांतील २७ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाली आहे. या सर्व विद्यार्थिनींवर उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत येणार्‍या कांबळगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाकघरातून विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या भोजनातून ही विषबाधा झाल्याचे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे. हे भोजनगृह शासनाकडून चालवले जाते. ५ ऑगस्टच्या रात्रीच्या भोजनात करण्यात आलेल्या दूधीच्या भाजीच्या माध्यमातून ही विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भोजनानंतर विद्यार्थी झोपी गेले. ६ ऑगस्टच्या सकाळी विद्यार्थ्यांना मळमळणे, उलट्या होणे असा त्रास झाला. रणकोळ येथील विद्यार्थिनींना ऐना आणि कासा येथील शासकीय रुग्णालयात, खंबाळे येथील विद्यार्थिनींना वाणगाव येथील शासकीय रुग्णालयात, तर आंबेसरी येथील विद्यार्थिनींना गंजाड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.