श्रावण शुक्ल चतुर्थी (८.८.२०२४) या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील पू. रमेश गडकरी यांचा ६७ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
पू. रमेश गडकरी यांच्या चरणी त्यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
‘पू. रमेश गडकरी यांचा माझ्याशी वर्ष १९९३ पासून संपर्क आहे. मी रविवारी रायगड जिल्ह्यातील साधकांसाठी अभ्यासवर्ग घेण्यासाठी पनवेल येथे येत असे. त्या अभ्यासवर्गात श्री. रमेश गडकरी आणि त्यांच्या पत्नी सौ. नीला गडकरी उपस्थित असत. त्यानंतर आम्ही मुंबई, ठाणे, रायगड, सोलापूर इत्यादी ठिकाणी झालेल्या सभा, यात्रा इत्यादी मोहिमांमध्ये एकत्रित प्रसारसेवा केली होती. आता आम्ही दोघेही देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात निवासाला असल्यामुळे एकमेकांच्या सतत संपर्कात असतो. मला पू. गडकरीकाकांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. प्रेमभाव
पू. गडकरीकाका साधकांशी समभावाने वागतात. ते साधकांना साधना आणि सेवा यांमध्ये येणार्या अडचणी सोडवून त्यांना साहाय्य करतात.
२. कौशल्य
पूर्वी पू. काकांचा स्वतःचा व्यवसाय होता. त्यांचे कामगारांकडून काम करून घेणे, मोठ्या आस्थापनांशी समन्वय करणे आणि वेगवेगळ्या साहित्याची निर्मिती करणे, यांमध्ये कौशल्य आहे. त्यांनी या कौशल्याचा उपयोग अध्यात्मप्रचार करणे आणि प्रचारासाठी लागणारे साहित्य, उदा. लोखंडी कमानी आणि धर्मसभेसाठी लागणारे व्यासपीठ इत्यादी बनवण्यासाठी केला. सध्या ते सनातनच्या सात्त्विक उत्पादनांच्या कार्यात योगदान देत आहेत.
३. जवळीक साधणे
पू. काका सर्वांशी सहजतेने बोलतात. त्यांची समाजातील व्यक्ती, साधक आणि संत यांच्याशी लगेच जवळीक होते. साधक त्यांना स्वतःच्या साधनेतील अडचणी सांगू शकतात. साधकांना पू. काकांचा आधार वाटतो.
४. उत्साही
पू. काकांना कोणतीही सेवा सांगितली, तरी ते त्वरित स्वीकारतात आणि उत्साहाने पूर्ण करतात. ते पहिल्यापासून धर्मकार्यात उत्साहाने सहभागी होतात.
५. अध्यात्म आणि धर्माचरण यांची आवड असणे
पू. काकांना लहानपणापासून अध्यात्माची आवड आहे. त्यांच्या घरी धार्मिक वातावरण असल्याने त्यांना स्तोत्र, पूजा-अर्चा यांची माहिती आहे. ते त्यांच्या दैनंदिन कृती आणि आचार-विचार सनातन धर्माशी जोडतात.
६. अनासक्त
पू. काकांना समर्थ रामदासस्वामी रचित ‘मनाचे श्लोक’ आणि ‘दासबोध’ आवडतो. दासबोधाच्या वाचनामुळे पू. काकांमध्ये अध्यात्माची आवड निर्माण झाली. त्यांनी शिवथरघळ येथे दासबोधाची पारायणे केली आहेत. ते मायेतील गोष्टींची आसक्ती सोडून आता अनासक्तपणे साधनारत आहेत.
७. त्यागी वृत्ती
पू. काकांचा मोठा व्यवसाय होता. त्यांचा बंगला होता आणि त्यांच्याकडे चारचाकी गाडी होती. त्यांनी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेऊन मायेतील सर्व गोष्टींचा त्याग केला. आता ते सहकुटुंब साधनारत आहेत.
८. देवाप्रतीच्या दृढ श्रद्धेच्या बळावर कठीण प्रसंगात स्थिर रहाणे
पू. काकांच्या व्यावहारिक आणि वैयक्तिक जीवनात अनेक चढ-उतार आले. ते देवाप्रतीच्या दृढ श्रद्धेच्या बळावर अनेक संकटांतून बाहेर आले. ते देवावर नितांत श्रद्धा ठेवून साधना आणि राष्ट्र अन् धर्म यांचे कार्य करत आहेत.
९. साधकांना नामजपादी उपाय सांगणे
पू. काका साधकांना नामजपादी उपाय सांगतात. ‘देवाने ही सेवा दिलेली आहे आणि देवच माझ्याकडून सेवा करून घेणार आहे’, अशी पू. काकांची श्रद्धा आहे. पू. काकांनी सांगितलेल्या नामजपाचा साधकांना लाभ होत आहे.
१०. गुरूंप्रती भाव
पू. काकांनी स्वतःला गुरुकार्यासाठी वाहून घेतले आहे. ‘जे झाले, जे होत आहे आणि जे होणार आहे, ती सर्व माझ्या गुरूंची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा आहे’, असा पू. काकांचा भाव आहे. ते कशाचाही कर्तेपणा घेत नाहीत.
‘धर्मासाठी जगणे म्हणजे जीवन आणि धर्माविना जगणे म्हणजे मरण !’, अशी पू. काकांची धारणा आहे. ‘अशा पू. गडकरीकाकांचा मला सत्संग लाभला. मला साधना आणि सेवा यांमध्ये त्यांचे साहाय्य लाभले अन् त्यांच्याकडून मला पुष्कळ शिकता आले’, त्याबद्दल मी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.७.२०२४)