१. पू. दातेआजींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे (प.पू. डॉक्टरांचे) बोलणे ऐकणे
‘प.पू. डॉक्टरांनी पू. दातेआजींना हाक मारल्यावर ‘पू. आजींच्या डोळ्यांची हालचाल होत आहे, तसेच पापण्या वर-खाली होत आहेत’, असे मला जाणवले. ‘प.पू. डॉक्टरांचे बोलणे पू. आजी ऐकत आहेत’, असा भाव पू. आजींच्या डोळ्यांत दिसत होता.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि साधक यांनी केलेले नामजपादी उपाय अन् त्याचे झालेले परिणाम
९.६.२०२४ या दिवशी प.पू. डॉक्टर आणि साधक यांनी पू. दातेआजी यांच्यासाठी उपाय, प्रयोग, न्यास आणि नामजप केले. त्याची माहिती पुढील सारणीत दिली आहे.
३. प.पू. डॉक्टरांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम भ्रमणसंगणकावर पहातांना पू. आजींचा चेहरा प्रफुल्लित होणे
प.पू. डॉक्टरांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम भ्रमणसंगणकावर खोलीत बसून पहाण्याची सोय केली होती. तेव्हा आम्ही पू. आजींना प्रार्थना केली, ‘‘तुम्हीही हा कार्यक्रम पहावा आणि ऐकावा.’’ त्यानंतर कार्यक्रम पहातांना पू. आजींचा चेहरा अतिशय प्रफुल्लित वाटत होता. त्यांचा श्वासही शीघ्र गतीने होत होता.’
– सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), पुणे (१२.६.२०२४)
प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीचा लाभ करून घ्या !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पुढे येणार्या घोर आपत्काळात वैद्यकीय उपचार मिळणे दुरापास्त होणार आहे’, हे ओळखून मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली आहे. या उपायपद्धतीद्वारे व्याधीग्रस्त व्यक्ती कुणाचेही साहाय्य न घेता स्वतःची व्याधी दूर करण्याचा प्रयत्न करू शकते किंवा उन्नत साधकही अन्य आजारी व्यक्तीसाठी या उपायपद्धतीद्वारे त्याची व्याधी दूर होण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात आहेत. त्यांच्या या गंभीर आजारपणात आधुनिक वैद्य त्यांच्यावर औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, तसेच अन्य साधकांना नामजपादी उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय आणि काही प्रयोगही करवून घेतले. उपायपद्धतीमुळे काय फरक जाणवतो ? याचाही अभ्यास केला. या प्रयोगातून आध्यात्मिक स्तरावर होणारा लाभ साधक आणि समाज यांना शिकता येईल, तसेच या उपचारपद्धतीचे महत्त्वही यातून अधोरेखित होईल, या दृष्टीने ही लेखमाला येथे प्रसिद्ध करत आहोत.
– संपादक
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |