खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक !
सांगली, ७ ऑगस्ट (वार्ता.) – भाजपला जातीयवादी, मनुवादी विचारांचा पक्ष ठरवून काँग्रेस राजकीय अपकीर्त करत आहे; मात्र काँग्रेसच जातीनिहाय जनणनेची मागणी करून फूट पाडण्याचे काम करत आहे. यापुढे भाजपच्या कोणत्याही नेत्याची अवहेलना सहन करणार नाही, अशी चेतावणी भाजपच्या पदाधिकार्यांनी येथे दिली.
काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ ‘जशास तसे’ उत्तर म्हणून भाजपच्या पदाधिकार्यांनी स्टेशन चौकातील दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मारकासमोर ४ ऑगस्ट या दिवशी खासदार ठाकूर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून त्यांना पाठिंबा दर्शवला. या वेळी आंदोलनात अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब कांबळे, गीतांजली ढोपे-पाटील, स्नेहजा जगताप, राजू मद्रासी, विकास आवळे, उदय मुळे उपस्थित होते.
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश मोहिते म्हणाले की, खासदार अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावून काँग्रेसने खासदार ठाकूर यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन केले, हे दुर्दैवी आहे. देशात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी काँग्रेसचीच असून जाती जातीत फूट पाडण्याचे काम काँग्रेसच करत आहे. भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस आणि अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे म्हणाल्या की, काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीविषयी, चहा व्यवसायाविषयी अवमानजनक टिपणी करत असतात. भाजपला जातीयवादी, मनुवादी विचारांचा पक्ष ठरवून राजकीय अपकीर्त करत आहेत. यापुढे भाजपच्या कोणत्या नेत्याची अशा पद्धतीची विटंबना अन् अवहेलना सहन करणार नाही.