माता अमृतानंदमयी यांच्यावर टीका करणार्या पुस्तकावर आधारित एका वृत्तवाहिनीने प्रसारित केला होता कार्यक्रम !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – ‘अम्मा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत माता अमृतानंदमयी यांच्यावर एका पुस्तकातून टीका करण्यात आली होती. या पुस्तकावरून एका वृत्तवाहिनीने कार्यक्रम सादर केला होता. माता अमृतानंदमयी यांच्या एका भक्ताने संबंधित वाहिनीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. त्यावरून त्या वाहिनीवर खटलाही चालू करण्यात आला होता. न्यायालयाने तो खटला रहित करण्याचा आदेश दिला आहे. ‘वृत्तवाहिनीने एखाद्या पुस्तकावर आधारित कार्यक्रम करणे अवमानकारक नाही. प्रसारमाध्यमे सार्वजनिक रूपाने उपलब्ध असलेल्या पुस्तकांवर चर्चा करू शकतात आणि तसे करण्याला योग्य टिप्पणी किंवा टीका मानली जाईल. हे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या अंतर्गत येते’, असे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.