दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : त्र्यंबकेश्‍वर मंदिरात पाणी शिरले !; श्‍वानाला वाचवतांना दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू !…

त्र्यंबकेश्‍वर मंदिरात पाणी शिरले !

नाशिक – मुसळधार पावसामुळे येथील त्र्यंबकेश्‍वर मंदिर परिसरातील रस्‍त्‍यांना नद्यांचे स्‍वरूप आले आहे. मंदिराच्‍या दक्षिण दरवाजाच्‍या पायर्‍यांवरून मंदिर परिसरात पाणी शिरले. यामुळे दक्षिण दरवाजाजवळील गायत्री मंदिरही पाण्‍याखाली गेले. पाण्‍यासह कचराही तेथे वाहून आला आहे. यामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली.


श्‍वानाला वाचवतांना दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू !

महाड (जिल्‍हा रायगड) – येथे श्‍वानाला वाचवतांना नील हेंद्रे (वय १८ वर्षे) याची दुचाकी घसरून ती उभ्‍या असलेल्‍या टँकरला धडकली. यात नील प्रचंड घायाळ झाला होता. त्‍याचे पाय आणि डोके यांना गंभीर दुखापत झाल्‍याने उपचाराच्‍या वेळी त्‍याचा मृत्‍यू झाला.


रेल्‍वे प्रवासात ‘डॉक्‍टर्स ऑन कॉल’ वैद्यकीय सुविधा उपलब्‍ध !

मुंबई  मध्‍य रेल्‍वेकडून प्रवासात वैद्यकीय आपत्‍कालीन परिस्‍थितीचा विचार करून प्रवाशांच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यासाठी ‘डॉक्‍टर्स ऑन कॉल’ ही २४/७ वैद्यकीय सेवा राबवण्‍यात आली आहे. रेल्‍वे प्रवासात प्रवाशांना तातडीने साहाय्‍य करण्‍यात यावे आणि त्‍यांच्‍यावर योग्‍य ते उपचार व्‍हावेत, यासाठी या सेवेचा प्रारंभ करण्‍यात आला आहे. या सेवेअंतर्गत जुलैमध्‍ये २ सहस्र १९ प्रवाशांना वैद्यकीय साहाय्‍य करण्‍यात आले.


मुंबईला पाणी पुरवणारे ७ पैकी ५ तलाव पूर्ण क्षमतेने भरले !

मुंबई – बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणार्‍या ७ जलाशयांपैकी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्‍य वैतरणा जलाशय’ पूर्ण भरले आहे. जुलै २०२४ मध्‍ये तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागले होते. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या ७ तलावांपैकी ५ तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. येत्‍या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्‍यास मुंबईला पाणीपुरवठा करणारे उर्वरित तलावही लवकरच भरतील. तसे झाल्‍यास मुंबईतील पाणी कपात रहित होऊ शकते.