चिंतनाचे महत्त्व !

‘अध्यात्म-ज्ञान-प्राप्तीचे रहस्य ज्यात साठवले आहे, त्याला ‘चिंतन’ असे नाव आहे. शास्त्र भौतिक असो वा आध्यात्मिक असो, त्याचा खरा अभ्यास चिंतनातूनच होतो. त्यात अध्यात्मशास्त्र, तर चिंतनाशिवाय समजणे शक्यच नाही, अशी परिस्थिती आहे. चिंतन, म्हणजे एखाद्या विषयावरील मूलभूत विचार ! चिंतन हे अधिक सखोल आणि सर्वव्यापी असते. कुठल्याही एका विषयाचा त्यात सांगोपांग, असा विचार असतो. त्यामुळे विषयाच्या गर्भात शिरण्याकरता, गती तर मिळतेच; परंतु चिंतनाने चित्तशुद्धी होते. ‘चित्त’ हा मनाचाच अतिमहत्त्वाचा कप्पा आहे. कपाटाचा चोरकप्पा असतो, तसा तो आहे. त्यावर मन आणि बुद्धी यांचाही प्रभाव असतो, तसेच आत्म्याचाही प्रभाव असतो. आत्म्याच्या प्रभावाने चित्त शुभकारी, प्रेमळ, दयार्द्र, त्यागी आणि निःस्वार्थी होते. याउलट मन आणि बुद्धी यांच्या प्रभावामुळे चित्त भोगी, दुष्ट, स्वार्थी आणि लबाड होते. विचारांवर विकारांचा प्रभाव पडतो. विकार बळावणे आणि त्यांच्या आधीन होणे, ही अशुद्धी.

(साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)