१. साडी नेसल्यामुळे आरंभी आध्यात्मिक त्रासात वाढ होणे; परंतु नंतर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन प्रसन्न आणि हलके वाटणे
‘सप्टेंबर २०२२ च्या अखेरच्या आठवड्यात आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये नवरात्रीच्या कालावधीत आश्रमात होणार्या यागांनिमित्त मी देवीचे चैतन्य अधिक प्रमाणात ग्रहण व्हावे, यासाठी साडी नेसत होते. मला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने मला साडी नेसतांना किंवा नेसल्यावर ‘अस्वस्थ वाटणे, घुसमटल्यासारखे होणे, ‘साडी पालटून पोषाख घालूया’, असे विचार येणे’, अशा प्रकारचे त्रास होत असतात. सकाळी साडी परिधान केल्यावर दुपारनंतर साडीच्या माध्यमातून माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन मला प्रसन्न आणि हलके वाटायचे.
२. साडी नेसतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे स्मरण आणि नामजप अन् प्रार्थना होणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने त्रासांवर मात करता येऊन साडी नेसणे
मला आध्यात्मिक त्रास होत असला, तरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने माझे त्रासाशी लढून त्यावर मात करत साडी नेसणे चालूच होते. त्यामुळे मला साडी नेसतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे स्मरण होणे, साडीच्या निर्या घालत असतांना नामजप होणे, प्रार्थना होणे, हलके वाटणे, अशा अनुभूती येत आहेत. साडी नेसण्यापूर्वी ‘या साडीचा मला आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊ दे’, अशी प्रार्थना मला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या आवाजात काही वेळा ऐकू येते.
३. साडी नेसल्यामुळे त्रासदायक शक्तीचे आवरण उणावणे आणि आनंदी असल्याचे जाणवणे
मला मागील ४ – ५ दिवसांत माझ्या देहाभोवती आनंदाचे तरंग जाणवत आहेत. माझ्या प्रसन्नतेत वाढ होऊन मला पुष्कळ हलके वाटत आहे. काही वेळा रात्री झोपतांनाही साडी नेसल्याने मला सकाळी लवकर ऊठता येऊ लागले. मला माझ्यावर अनिष्ट शक्तींचे सूक्ष्म त्रासदायक आवरण जाणवले नाही. अनेक साधकांनी मला सांगितले, ‘तू या दिवसांत आनंदी दिसत आहेस.’ तेव्हा ‘या आनंद तरंगांचे प्रमाण पुष्कळ अधिक असल्याने त्यांनाही ते जाणवले’, हे मला लक्षात आले. दिवसभरातही माझ्यावर त्रासदायक आवरण येण्याचे प्रमाण अन्य दिवसांच्या तुलनेत उणावल्याचे मला जाणवले.
४. साडी नेसल्याने मला आध्यात्मिक उपायांच्या वेळी क्षात्रवृत्ती अधिक जाणवली आणि मला ‘साडी म्हणजे एक शस्त्र आणि कवच आहे’, असेही काही वेळा अनुभवता आले.
‘हे गुरुराया, मला तुमच्याच कृपेने आचारधर्माचे महत्त्व समजले. माझ्या तीव्र त्रासातही माझ्याकडून त्याचे पालन झाले. त्यातील आनंदाची अनुभूती घेता आली. दैनंदिन जीवनातील साडी नेसण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीतूनही आनंद देऊन तो घेण्यास तुम्ही मला शिकवले, त्याबद्दल कृतज्ञता !’
– आधुनिक वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी, फोंडा, गोवा.(६.११.२०२२)
|