प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
प्रश्न : दया च परा प्रोक्ता ?
अर्थ : श्रेष्ठ प्रकारची दया कोणती ?
उत्तर : दया सर्वसुखैषित्वम् ।
अर्थ : ‘सर्वांना सुख लाभावे, अशी इच्छा करणे’, हीच दया आहे.
आपल्या धर्मामध्ये व्यक्ती स्वतःच्या घरी काही महत्त्वाचे आणि चांगले धर्मकृत्य करते. या प्रत्येक धर्मकृत्याच्या शेवटी प्रार्थना केली जाते की,
सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ।।
अर्थ : या भूमीवर सर्वांनी सुखी असावे. सर्वांनी रोग, आपत्ती रहित असावे. शुभदायक, कल्याणकारक आणि मंगल अशा घटना सर्वांना अनुभवता याव्यात. कुणाच्याही वाट्याला कोणत्याही प्रकारचे दुःख येऊ नये.
माणूस स्वतःच्या घरी, स्वतः कष्ट उपसून, स्वतःच्या पदरचे द्रव्य वेचून धर्मकृत्य करतो. ‘सुख लाभावे किंवा मनोरथपूर्ती व्हावी’, अशी प्रार्थना स्वतःपुरती किंवा स्वतःच्या कुटुंबापुरती मर्यादित ठेवत नाही. ‘सर्वांना, सर्व प्राणिमात्रांना सुख लाभावे, त्यांचे कल्याण व्हावे’, अशी अपेक्षा तो करतो. इतकी उदात्त भावना अन्यत्र कुठे आहे कि नाही, हे मला ठाऊक नाही. बहुधा नसावी. दयेचा अर्थ इतका व्यापक आहे. भिकार्याला ५-१० रुपये देणे, गोळाभर अन्न कुणाच्या पदरात टाकणे, जुने-पुराणे वस्त्र मोलकरणीला देणे, म्हणजे काही दया नाही. दया बाळगतांना आपपर भेद असू नये. ‘दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ।।’, असा आदर्श संतांनी सांगितला आहे. अशी दयाबुद्धी प्रामाणिकपणे सर्वांच्या अंतःकरणात राहिली आणि मनुष्य तद्नुसार कृती यथाशक्ती करत राहिला, तर समाजात किंवा राष्ट्रात सुख, स्वास्थ्य अन् समाधान ओसंडून वाहिल्याविना रहाणार नाही.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ‘यक्षप्रश्न’ या ग्रंथातून)