ब्रिटनमधील नवनिर्वाचित हिंदु खासदार जीवन संधर यांचे वक्तव्य
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लॉफबरो मतदारसंघातून खासदार झालेले भारतीय वंशाचे जीवन संधर निवडून आले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खासदार संधर म्हणाले, ‘‘मला भारत आणि ब्रिटनचा सत्ताधारी मजूर पक्ष यांच्यातील संबंध दृढ करायचे आहेत. सार्वत्रिक निवडणुकीतील विजयानंतर आमचे लक्ष भारत आणि आमच्या देशातील प्रवासी भारतीय समुदाय यांच्याशी संबंध सुधारण्यावर आहे.’’ संधर हे प्रथमच इंग्लंडमधील ईस्ट मिडलँड्स भागातील लॉफबरो मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. संधर यांचा जन्म पूर्व इंग्लंडमधील ल्युटन शहरात झाला. त्यांचे आई-वडील पंजाबमधून ब्रिटनला आले होते.
जीवन संधर पुढे म्हणाले की,
१. भारत आणि ब्रिटन यांच्यात महत्त्वाची भागीदारी आहे. भारतासमवेत व्यापार करारावरही काम चालू आहे.
२. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतासोबतचे आमचे संबंध सुधारावेत जेणेकरून आमचे दोन्ही देश पुष्कळ काही साध्य करू शकतील, अशी आमची इच्छा आहे.
३. मला भारतीय असण्याचा आणि ब्रिटनमधील माझ्या योगदानाचा अभिमान आहे. ब्रिटनमध्ये भारतीय संस्कृती बर्यापैकी दिसून येते.
४. मी एक अर्थतज्ञ आहे आणि माझे काम माझ्या मतदारसंघातील लोकांच्या खिशात अधिक पैसे टाकणे, हे आहे. यासाठी मी स्वच्छ ऊर्जेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि लॉफबरोमध्ये हरित समृद्धी आणण्यासाठी काम करत आहे.