माले (मालदीव) – भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मालदीवचे कर्ज फेडण्यासाठी आम्हाला फार साहाय्य केले आहे, असे विधान मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांनी केले. ते मालदीवच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करतांना बोलत होते.
भारताने ‘शेजारी देशांना प्रथम प्राधान्य’ या धोरणांतर्गत मालदीवला ४०० कोटी रुपयांचे साहाय्य केले आहे. याविषयी मालदीवने भारताचे आभार मानले. काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मालदीवला चेतावणी दिली होती की, जर त्याने त्याच्या आर्थिक धोरणात पालट केले नाहीत, तर त्याला कर्जाविषयी समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
मालदीवचे पर्यटनमंत्री भारतात ‘रोड शो’ (फेरी) करणार !
जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर मालदीवला भेट देणार्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
दोन्ही देशांमधील तणाव दूर करण्यासाठी मालदीवचे पर्यटनमंत्री इब्राहिम फैसल भारत दौर्यावर येत आहेत. भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ते नवी देहली, मुंबई आणि बेंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये ‘रोड शो’ (फेरी) करणार आहेत. या वेळी ते भारतियांना मालदीवमध्ये अधिकाधिक संख्येने येण्याचे आवाहनही करणार आहेत.