नवी मुंबई परिसरातील महिला आणि तरुणी यांच्‍या हत्‍या प्रकरणांचे खटले जलदगती न्‍यायालयात चालवावेत ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

  • मृत यशश्री शिंदे हिच्‍या पीडित कुुटुंबियांची अंबादास दानवे यांनी भेट घेतली !

  • विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पोलीस आयुक्‍तांकडे मागणी

नवी मुंबईचे पोलीस आयुक्‍त मिलिंद भारंबे (डावीकडे) यांना निवेदन देताना अंबादास दानवे यांच्यासह इतर मान्यवर

पनवेल, २९ जुलै (वार्ता.) – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मृत यशश्री शिंदे हिच्‍या कुटुंबियांच्‍या समवेत आहे. आरोपी दाऊद शेख याला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा होण्‍यासाठी प्रयत्न करण्‍यात येतील. नवी मुंबई येथील कोपरखैरणे, नेरूळ आणि उरण भागांत महिला अन् तरुणी यांची हत्‍या झाल्‍याच्‍या धक्‍कादायक घटनांमुळे समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व घटनांतील आरोपींना तात्‍काळ अटक करून कठोर शिक्षा होण्‍यासाठी हे खटले जलदगती न्‍यायालयात चालवून कुटुंबियांना न्‍याय द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २९ जुलै या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केली. या मागणीचे निवेदन त्‍यांनी शिष्‍टमंडळासह नवी मुंबईचे पोलीस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांना भेटून दिले. ‘लव्‍ह जिहाद’ प्रकरणातून धर्मांध दाऊद शेख याने कु. यशश्री शिंदे हिची अमानुषपणे हत्‍या केल्‍याची घटना २ दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या घटनेचा राज्‍यात निषेध होत आहे. त्‍या पार्श्‍वभूमीवर तिच्‍या कुटुंबियांची अंबादास दानवे यांनी त्‍यांच्‍या रहात्‍या घरी भेट घेऊन सांत्‍वन केले. त्‍या वेळी ते बोलत होते.

अंबादास दानवे पुढे म्‍हणाले की, या प्रकरणी आम्‍हाला राजकारण करायचे नाही. आरोपीचा शोध चालू आहे. आरोपी वाचणे शक्‍य नाही. नवी मुंबई पोलीस त्‍यांंचे काम करत आहेत. त्‍यांना पुरेसा वेळ मिळायला हवा. ४८ घंट्यांच्‍या आत पोलीस आरोपीला शोधून काढतील, असा विश्‍वास आहे.