प्रतापगडाप्रमाणे विशाळगडही अतिक्रमणमुक्त करा ! – हिंदु जनजागृती समिती

विशाळगड अतिक्रमणमुक्तीसाठी मुंबईमध्ये मूकनिदर्शने !

मूकनिदर्शनात सहभागी राष्ट्रप्रेमी

मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – ‘मुक्त झाला प्रतापगड, वाट पहातोय विशाळगड’, ‘अब याचना नही, रण होगा, विशाळगड अतिक्रमणमुक्त होगा’, ‘ना हाजी का ना काझी का, हर गड है छत्रपती शिवाजी का’, असे फलक हातात धरून हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी २८ जुलै या दिवशी मुंबईमध्ये मूकनिदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली दादर (पश्चिम) येथे हे मूकनिदर्शने करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याच्या पद्धतीप्रमाणे ‘शिंदे सरकार, विशाळगडाचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करा’, अशी मागणी या मूकनिदर्शनात करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झालेल्या कोल्हापूरमधील विशाळगडावर १५८ अतिक्रमणे होती. जिल्हा प्रशासनाने यांतील १०४ अतिक्रमणे हटवली असून सद्य:स्थितीत मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली आहे. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सरकारने विशाळगडावरील ही अतिक्रमणे त्वरित हटवावीत, अशी मागणी या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी केली. या आंदोलनामध्ये ‘बा रायगड परिवार संघटने’चे श्री. आदित्य माने, हिंदु महासभेचे श्री. पांडुरंग पवार, ‘भटकंती कट्टा’ संघटनेचे श्री. नितीन जाधव, सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विशेष

१. या निदर्शनामध्ये युवक-युवती सहभागी झाले होते.

२. या वेळी अनेक नागरिकांनी थांबून निदर्शनाचा विषय समजून घेतला, तर येणार्‍या जाणार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

३. भाईंदर येथील ३ युवती निदर्शन पाहून सहभागी झाल्या.

गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – हेमंत पुजारे, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या गड-दुर्गांचे रक्षण व्हावे, यासाठी आम्ही निदर्शने करत आहोत. त्यांच्यामुळे ज्या महाराष्ट्राचे रक्षण झाले, त्या राज्यात शिवरायांच्या गड-दुर्गांच्या रक्षणासाठी आंदोलन करावे लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे. हे अतिक्रमण सरकारने त्वरित हटवून विशाळगडासह अन्य सर्व गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करावेत.