विद्यार्थ्यांना मारहाण केल्याने पुरंदर तालुक्यातील २ शिक्षकांच्या विरोधात गुन्हा नोंद !

पुणे – मारहाणीची शिक्षा करून विद्यार्थ्यांना इजा केल्याप्रकरणी पुरंदर तालुक्यातील २ शिक्षकांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. गणिताची वही न आणल्याचा राग आल्यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्याला चापट मारली. त्यामुळे विद्यार्थ्याच्या कानाला इजा झाली, तसेच डाव्या कानाखाली चापट मारल्याने मुलाचा कान दुखत असून त्याला ऐकूही येत नाही. त्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, असेही तज्ञ डॉक्टरांनी सांगितले. सासवड येथील वाघेरे हायस्कूल येथे हा प्रकार घडला. विद्यार्थ्याचे वडील अधिवक्ता संतोष कचरे यांनी सासवड पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. तक्रारी अन्वये गणिताचे शिक्षक गणेश पाठक यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पुरंदर तालुक्यातील दिवे येथील ‘श्रीराम गुरुकुल’ पाठशाळेमध्येही शाळेत शिकणार्‍या मुलाला काठीने पाठीवर, तसेच पायावर मारहाण केल्याविषयी शिक्षक मंदार शहरकर यांच्या विरोधातही गुन्हा नोंद केला आहे. मुलांना सांभाळण्याची आणि काळजी घेण्याची आवश्यकता असतांनाही संबंधित मुलगा भांडण करत असल्याने त्याला शिक्षकांनी मारहाण केली. सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी पुढील अन्वेषण करत आहेत.