चीन हिंद महासागरात घुसखोरी करत आहे !

अमेरिकेच्‍या संसदेत खासदार यंग किम यांनी दिली माहिती

हिंदी महासागर (प्रतिकात्मक छायाचित्र)

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – अमेरिकेच्‍या ज्‍येष्‍ठ खासदार यंग किम यांनी संसदेत सांगितले की, चीन हिंदी महासागरातील महत्त्वाच्‍या भागात घुसखोरी करत आहे. या जलक्षेत्रातील मुक्‍त विहाराच्‍या अधिकारांना बाधा आणत आहे. अमेरिकी परराष्‍ट्र धोरण आणि राष्‍ट्रीय सुरक्षा यांसाठी दक्षिण आशिया महत्त्वाचा आहे.

१. काँग्रेसच्‍या परराष्‍ट्र व्‍यवहार समितीमधील इंडो-पॅसिफिक समस्‍यांवरील उपसमितीच्‍या अध्‍यक्षा खासदार यंग किम म्‍हणाल्‍या की, प्रदेशातील भू-राजकीय परिस्‍थिती पालटत आहे. यामुळे अमेरिकेसमोर अनेक आव्‍हाने निर्माण होऊ शकतात. हिंद महासागर हा जागतिक व्‍यापारासाठी महत्त्वाचा मार्ग आहे. ८० टक्‍के समुद्री तेल व्‍यापार आणि ४० टक्‍के जागतिक व्‍यापार हिंद महासागरातून जातो. चिनी कम्‍युनिस्‍ट पक्ष (सीसीपी) हिंद महासागरातील महत्त्वाच्‍या मार्गांवर नियंत्रण मिळवत आहे आणि या जलक्षेत्रात मुक्‍त संचार करण्‍याच्‍या अधिकारात अडथळा आणत आहे.

अमेरिकेच्‍या ज्‍येष्‍ठ खासदार यंग किम

२. किम यांनी पुढे सांगितले की, गेल्‍या महिन्‍यात माझ्‍या उपसमितीने इंडो-पॅसिफिक, दक्षिण चीन समुद्र आणि तैवान सामुद्रधुनी येथे चीन घेत असलेल्‍या आक्रमक भूमिकेविषयी चर्चा केली. सीसीपी भारतासोबतच्‍या नियंत्रणरेषेवर सीमा संघर्ष वाढवत आहे आणि त्‍याच्‍या पाणबुड्या अन् युद्धनौका नियमितपणे हिंदी महासागरात जातात.

चीन बांगलादेशामध्‍ये उपस्‍थिती वाढवत आहे !

मध्‍य आशियाचे साहाय्‍यक परराष्‍ट्र सचिव डोनाल्‍ड लू यांनी संसदेत सांगितले की, बांगलादेशामध्‍ये चीनच्‍या वाढत्‍या उपस्‍थितीच्‍या शक्‍यतेबद्दल आम्‍हाला चिंता आहे; परंतु मी सांगू इच्‍छितो की बांगलादेशी लोक या प्रकरणात फार घाई करणार नाहीत. ते याबद्दल खूप काळजी घेतील.

खासदार बिल कीटिंग यांनी विचारले की, बांगलादेशातील चीनचा वाढता प्रभाव आणि रशियाचा प्रभाव लक्षात घेता ही चिंतेची गोष्‍ट वाटते. यावर लू यांनी म्‍हटले की, बांगलादेशात सर्वांत प्रभावशाली देश प्रत्‍यक्षात रशिया किंवा चीन नसून भारत आहे.  आम्‍ही बांगलादेश आणि त्‍या प्रदेशात राबवत असलेल्‍या धोरणांबद्दल भारताशी सक्रीय संवाद साधत आहोत.

संपादकीय भूमिका

  • जे भारताने उघडपणे सांगायला हवे, ते अमेरिकेला सांगावे लागत आहे, हे भारताच्‍या सुरक्षेसाठी योग्‍य नाही !