मुंबई – २१ जुलै या दिवशी भारतीय नौदलाच्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या आय.एन्.एस्. ब्रह्मपुत्र या युद्धनौकेच्या डागडुजीचे काम चालू असतांना तिच्या काही भागांत आग लागली. अन्य जहाजांवरील अग्नीशमन कर्मचार्यांनी आग तातडीने नियंत्रणात आणली; परंतु या आगीमुळे युद्धनौकेची मोठी हानी झाली. या घटनेनंतर युद्धनौका एका बाजूला झुकली आहे. बरेच प्रयत्न करूनही आय.एन्.एस्. ब्रह्मपुत्राला सरळ करण्यात अपयश आले आहे. युद्धनौकेला आग लागण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश नौदलाकडून देण्यात आलेले आहेत. आग लागल्यानंतर एका खलाशाचा अपवाद वगळता अन्य सगळ्यांना वाचवण्यात यश आले. या दुर्घटनेनंतर १ कनिष्ठ खलाशी बेपत्ता आहे. बचाव दलाकडून त्याचा शोध चालू आहे.
आय.एन्.एस्. ब्रह्मपुत्रची वैशिष्ट्ये
ही क्षेपणास्त्र विनाशिका वर्ष २००० मध्ये भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली होती. हवेत क्षेपणास्त्र सोडण्याची क्षमता ब्रह्मपुत्रामध्ये होती. अत्याधुनिक हत्यारे, मध्यम पल्ल्याच्या तोफा, जवळून वार करणार्या तोफा, शत्रूच्या जहाजांना आणि विमानांना नष्ट करण्याची क्षमता तिच्यात होती.
शत्रूवर लक्ष ठेवणारी आणि वेळ पडल्यास आक्रमण करणारी ‘सीकिंग’ आणि चेतक हेलिकॉप्टर तिच्यावर होती. या युद्धनौकेवर ४० अधिकारी आणि ३३० खलाशी तैनात असत.