Elon Musk Son : लिंगपरिवर्तन शस्‍त्रक्रिया म्‍हणजे हत्‍या आणि नसबंदी करण्‍यासारखे ! – इलॉन मस्‍क

इलॉन मस्‍क

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – ‘टेस्‍ला’ आणि ‘स्‍पेसएक्‍स’ यांचे प्रमुख इलॉन मस्‍क यांनी म्‍हटले आहे की, लिंगपरिवर्तन शस्‍त्रक्रियेमुळे त्‍यांचा मुलगा त्‍यांच्‍यापासून दूर गेला. मानसोपचारतज्ञ डॉ. जॉर्डन पीटरसन यांना दिलेल्‍या मुलाखतीत मस्‍क म्‍हणाले, ‘‘लिंगपरिवर्तन शस्‍त्रक्रिया ही मूलत: मुलाची हत्‍या आणि नसबंदी करण्‍यासारखे आहे. हा एक विषाणू आहे.’’ इलॉन मस्‍क यांचा मुलगा झेवियर याने वर्ष २०२२ मध्‍ये वयाची १८ वर्षे पूर्ण केल्‍यानंतर त्‍याने लिंगपरिवर्तन करून तो मुलगी बनला. यानंतर झेवियर याने त्‍याचे नाव पालटून विवियन जेना विल्‍सन असे ठेवले.

मस्‍क म्‍हणाले, ‘‘कोरोना महामारीच्‍या काळात मला फसवून माझ्‍या मुलाचे लिंग पालटण्‍याच्‍या संबंधी कागदपत्रांवर स्‍वाक्षरी घेण्‍यात आली होती. मला कळत नव्‍हते की, काय होणार आहे ? त्‍यावेळी कोरोना महामारीमुळे बराच गोंधळ उडाला होता. मला सांगण्‍यात आले की, माझा मुलगा आत्‍महत्‍या करू शकतो.’’

मस्‍क म्‍हणाले, मी या विषाणूशी लढेन !

स्‍वत:चा अनुभव कथन करतांना इलॉन मस्‍क म्‍हणाले, ‘या (लिंगपरिवर्तन करण्‍याच्‍या) शस्‍त्रक्रियेला ‘डेडनेमिंग’ म्‍हटले जाते; कारण यामुळे मुलाचा मृत्‍यू होतो. शस्‍त्रक्रियेनंतर मी माझा मुलगा गमावला. तेव्‍हाच मी या विषाणूशी लढण्‍याचे ठरवले होते.’ डेडनेमिंग म्‍हणजे लिंगपरिवर्तन करण्‍याआधी जे नाव असते, ते नाव होय.

एका वृत्तसंस्‍थेने दिलेल्‍या माहितीनुसार इलॉन मस्‍क यांनी गेल्‍या वर्षी सांगितले होते की, ते ट्रान्‍सजेंडर (लिंगपरिवर्तन करणारे, तृतीयपंथी आदींशी निगडित संज्ञा) वैद्यकीय उपचारांना गुन्‍हेगार ठरवण्‍यासाठी लढा देतील.

विवियनने शस्‍त्रक्रियेेनंतर वडिलांचे नाव सोडले

मस्‍क यांच्‍या मुलाने लिंगपरिवर्तन केल्‍यानंतर स्‍वतःचे विवियन असे नाव ठेवले. त्‍यानंतर तिने ‘मला माझ्‍या वडिलांशी संबंध ठेवायचे नाहीत’, असे घोषित केले होते.  विवियनने तिच्‍या नावातून मस्‍क हे आडनाव काढून टाकून आईच्‍या माहेरचे आडनाव वापरण्‍यास आरंभ केला. विवियनची आई जस्‍टिन विल्‍सन कॅनेडियन लेखिका आहे. विवियन ज्‍या शाळेत शिकत होती, तेथे तिचा बुद्धीभेद झाल्‍यामुळे ती साम्‍यवादी बनली. साम्‍यवाद्यांना ‘जो श्रीमंत असतो, तो वाईट असतो’, असे शिकवले जाते. या विचारसरणीचा परिणाम विवियन हिच्‍यावर झाला. त्‍यामुळे तिने मस्‍क यांच्‍याशी संंबंध तोडले. यामुळेच मस्‍क यांनी ‘माझ्‍या मुलाची हत्‍या झाली’, असे मुलाखतीत म्‍हटले आहे.