Shahjahanpur Encounter : उत्तरप्रदेश येथील कुख्यात दरोडेखोर शहानूर चकमकीत ठार !

दरोडा घालतांना महिलांवर करत होता अत्याचार, ३२ गुन्हे नोंद !

कुख्यात दरोडेखोर शहानूर चकमकीत ठार

शहाजहांपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने एक मोठे यश प्राप्त करत येथे कुख्यात दरोडेखोर शाहनूर याला ठार मारले आहे. त्याच्याशी झालेल्या एका चकमकीत गोळीबार होत असतांना पोलिसांनी केलेल्या आक्रमणात त्याच्या छातीत गोळी लागली. त्याला रुग्णालयात भर्ती करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शाहनूर याने अनेक ठिकाणी दरोडे घातले होते. दरोडा घालतांना तो तेथील महिलांवर अत्याचार करत असे. पोलीस गेल्या अडीच महिन्यांपासून त्याचा शोध घेत होते. त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले होते. शाहनूर उपाख्य शानू हा संभल जिल्ह्यातील रहिवासी होता. अनेक जिल्ह्यांत दरोडा, हत्या, बंडखोरी, दरोडा आदी गुन्ह्यांसाठी त्याच्याविरुद्ध ३२ हून अधिक गुन्हे नोंद आहेत.

पोलिसांना शहानूर हा शहाजहांपूर येथे असल्याचे समजले. रात्री १ वाजता पोलिसांनी त्याला घेराव घातला. त्याने स्वतःला पोलिसांकडे सुपुर्द करण्याचे आवाहन पोलिसांनी केले; परंतु त्याने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार चालू केला. अनुमाने १२ मिनिटे शहानूर आणि त्याचे साथीदार, तसेच पोलीस यांच्यात गोळीबार झाला. त्याचा एक साथीदार घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

सर्वत्रच्या पोलिसांनी अशा दरोडेखोरांना व्यूहरचना करून अशा प्रकारेच ठार मारले पाहिजे, असे सतत वाढत असलेल्या गुन्हेगारीवरून सर्वसाधारण जनता म्हणू लागली, तर त्यात चूक ते काय ?