पार्श्वगायिका अल्का याज्ञिक यांचा सल्ला !

अलका याग्निक

आपल्या दैवी सुमधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार्‍या पार्श्वगायिका अल्का याज्ञिक यांना गेल्या काही दिवसांपासून दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. गेल्या मासात विमानातून बाहेर पडल्यावर त्यांना काहीही ऐकू येत नसल्याचे जाणवू लागले. विषाणूंच्या आक्रमणामुळे (‘व्हायरल अटॅक’मुळे) ‘रेअर सेन्सरी न्यूरो नर्व्ह हेअरिंग लॉस’, म्हणजेच ‘दुर्मिळ संवेदी मज्जातंतूंमुळे श्रवणशक्ती गमावणे’, असे निदान डॉक्टरांनी केले. या आजाराने ग्रस्त झाल्यावर त्यांनी लोकांना ‘सतत हेडफोन लावून आणि मोठ्या आवाजात संगीत ऐकू नका’, असा सल्ला दिला आहे. डॉक्टरांच्या मते हा आजार दुर्मिळ असला, तरी आताची पिढी ज्या प्रमाणात ‘हेडफोन’ आणि ‘इअरफोन’ यांवर सातत्याने गाणी ऐकत असते वा चित्रपट पहात असते, हे पहाता भारतात हा आजार सर्वत्र पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही ! अल्का याज्ञिक यांनी दिलेला सल्ला आणि डॉक्टरांनी दिलेली चेतावणी यांवर आजची पिढी खरच विचार करणार आहे का ?

१. ‘इअरफोन’चे शारीरिक दुष्परिणाम !

सध्या ‘इअरफोन’, ‘हेडफोन’, ‘ब्लूटूथ’ आणि ‘इअरबड्स’ या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे प्रस्थ प्रचंड वाढले आहे. सातत्याने ‘इअरफोन’ किंवा ‘हेडफोन’ लावल्याने केवळ कानावरच नव्हे, तर शरिरातील अन्य नाजूक अवयवांवरही विपरित परिणाम होतो. प्रत्येकाच्या कानाची ऐकण्याची क्षमता साधारणतः ९० डेसिबल्स एवढी असते. ‘इअरफोन’च्या अतीवापरामुळे ती ४० ते ५० डेसिबल्सपर्यंत किंवा त्याहूनही न्यून होऊ शकते. ‘इअरफोन’ अथवा ‘हेडफोन’ लावून घंटोन्‌घंटे गाणे ऐकणे कान आणि हृदय यांसाठी अत्यंत घातक असते. ‘इअरफोन’मधून प्रक्षेपित होणार्‍या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे तीव्र डोकेदुखी आणि मायग्रेन यांची समस्या निर्माण होऊ शकते. ‘इअरफोन’च्या अतीवापरामुळे निद्रानाश आणि ‘स्लीप ॲपनिया’चा त्रासही होऊ शकतो. ‘इअरफोन’ किंवा ‘इअरबड्स’ कानाच्या पडद्याला चिकटून लावले जातात. बराच वेळ ते लावून राहिल्यास कानाच्या पडद्यापर्यंत हवा पोचत नाही. त्या ठिकाणी ओलावा निर्माण होऊन बुरशी किंवा विषाणूजन्य आजार उद्भवू शकतात. नाक-कान-घसा तज्ञांच्या मते अनावश्यक असलेले आवाज कानाच्या पडद्यावर आदळल्यानंतर तेथून परत पाठवण्यास आपला कान सक्षम असतो; परंतु जेव्हा आपण ‘इअरफोन’ लावतो तेव्हा ‘मल्टिपल फ्रिक्वेन्सी’चा आवाज कानाच्या पडद्यावर आदळत रहातो. परिणामी हे आवाज कानाच्या रक्तवाहिन्यांना क्षीण करतात.

श्री. जगन घाणेकर

२. ‘इअरफोन’चे सामाजिक आणि मानसिक दुष्परिणाम !

केवळ प्रवासातच नव्हे, तर काही जण घरीसुद्धा ‘इअरफोन’वर किंवा ‘ब्लूटूथ’वर गाणी ऐकण्यात पुष्कळ वेळ घालवतात. सातत्याने गाणी ऐकण्यात व्यग्र असल्याने अशांच्या ज्ञानाच्या कक्षा खुंटतात, मनोविकार जडतात. कानाला सातत्याने ‘इअरफोन’ लावणार्‍यांचा स्वभावसुद्धा एकलकोंडा बनतो. मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवतांना ‘मोबाईल’वर वा कानाला ‘इअरफोन’ लावून बोलणे दंडात्मक गुन्हा आहे. वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक असते. रस्त्यावर चालतांना, रेल्वे रूळ ओलांडतांना प्रतिवर्षी अनेक अपघात होतात, ज्यामध्ये कानाला ‘इअरफोन’ लावून रस्ता किंवा रूळ ओलांडणार्‍यांची संख्या सर्वाधिक असते.

‘इअरफोन’, ‘हेडफोन’, ‘ब्लूटूथ’ आणि ‘इअरबड्स’ यांसारखी आधुनिक साधने मानवाच्या सुविधेसाठी सिद्ध करण्यात आली आहेत; आजमितीला मानव या साधनांच्या इतका आहारी गेला आहे की, हीच साधने मानवाचे आरोग्य बिघडवण्याचे कार्य करत आहेत. यावर कुठेतरी नियंत्रण आणायला हवे. या साधनांच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी तरुणांच्या पालकांनी आणि शालेय, तसेच महाविद्यालयीन शिक्षकांनी पुढाकार घ्यायला हवा !

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.