यंत्रमानव अभिशाप कि वरदान ?

दक्षिण कोरियातील गुमी शहर परिषदेत घडलेल्या घटनेमुळे मानव आणि यंत्र यांमधील मूलभूत भेद उजेडात आले आहेत. या घटनेत प्रशासकीय कामकाज करणारा एक रोबोट (यंत्रमानव) पायर्‍यांवरून खाली पडून बेशुद्ध झाला. त्यापूर्वी साक्षीदारांनी रोबोटचे असामान्य वर्तन वर्णन केले, ज्यात पायर्‍यांवरून पडण्यापूर्वी तो इकडे तिकडे फिरत असल्याचे त्यांनी म्हटले. ऑगस्ट २०२३ पासून कार्यरत असलेला हा रोबोट कागदपत्रांचे वितरण, स्थानिकांना माहिती पुरवणे असे कार्य करत होता. तो स्वतंत्रपणे कार्य करत होता, तसेच उद्वाहन यंत्र (लिफ्ट) बोलावून वेगवेगळ्या मजल्यांवर जाण्याची क्षमताही त्याच्याकडे होती.

या घटनेमुळे व्यापक चर्चा रंगली असून काहींनी या घटनेला दक्षिण कोरियातील पहिली ‘रोबोट आत्महत्या’ म्हटले आहे. दक्षिण कोरिया ‘रोबोटिक्स’च्या व्यापक प्रमाणात वापर करणारा देश आहे. तेथे ‘१० कर्मचार्‍यांमागे एक औद्योगिक रोबोट’ या प्रमाणात रोबोटचा वापर केला जातो.

या घटनेमुळे रोबोटमध्ये ताण आणि भावनात्मक निर्णय घेण्याची क्षमता यांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याचप्रमाणे या घटनेमुळे आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या अनुषंगाने मानवी जीवनातील योग, ध्यान आणि आध्यात्मिकता यांचे महत्त्वही अधोरेखित झाले. रोबोटच्या आत्महत्येच्या घटनेमुळे काही महत्त्वाची सूत्रे उपस्थित होतात. ती पुढीलप्रमाणे –

श्री. नारायण नाडकर्णी

१. रोबोट भावनात्मक निर्णय घेऊ शकतात का ?

सध्याचे रोबोट हे कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणालीद्वारे संचलित होतात आणि त्यांच्यात भावना किंवा भावनांवर आधारित निर्णय घेण्याची क्षमता नसते. प्रत्यक्षात ‘आत्महत्या’ हा शब्द मानवी शब्द असून मानवी कृतीशी संबंधित आहे. या घटनेमुळे मानवी वैशिष्ट्य रोबोटवर लादण्याचा प्रयत्न होत आहे. वस्तूतः रोबोटचे पायर्‍यांवरून पडणे, हे तांत्रिक बिघाडामुळे झाले असण्याची शक्यता आहे.

जर भविष्यात कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणालीमध्ये भावनात्मक अभिनयाची क्षमता विकसित करता आली, तर त्यामुळे नवीन धोके आणि नैतिक चिंता उद्भवू शकतात, ज्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणालीचे काळजीपूर्वक नियमन आणि देखरेख आवश्यक असेल.

२. मानवाला येणारा ताण आणि त्याचा सामना करण्याचे कौशल्य

आजच्या वेगवान जगात कामाचा ताण, सामाजिक अपेक्षा आणि वैयक्तिक आव्हाने यांसारख्या घटकांमुळे तणाव एक समस्या आहे. योग आणि ध्यान यांमुळे तणावाचे व्यवस्थापन, मानसिक सुस्पष्टता वाढवणे आणि एकूणच सर्वांगीण कल्याणास साहाय्यता होते. त्याचप्रमाणे तणाव निमूर्लनासाठी अनेकांना आध्यात्मिक कृतींद्वारे शांतता लाभते आणि जीवनाचा उद्देश प्राप्त होतो, ज्यामुळे ताणाविरुद्ध बळ प्राप्त होऊ शकते. तणावाच्या गंभीर प्रकरणांसाठी औषधे आवश्यक असली, तरी योग आणि ध्यान यांसारख्या सर्वांगीण व्यवहारांचा वैद्यकीय उपचारांना पूरक म्हणून समावेश करणे महत्त्वाचे आहे.

३. निष्कर्ष

ही घटना मानव आणि यंत्र यांमधील मूलभूत भेद दाखवणारी आहे. रोबोट कार्यक्षमतेने कार्य करू शकतात; परंतु त्यांच्याकडे मानवांप्रमाणे भावनात्मक आणि संज्ञानात्मक क्षमतांचा अभाव आहे. मानवासाठी योग, ध्यान आणि आध्यात्मिकता यांद्वारे तणाव व्यवस्थापन अन् मानसिक आरोग्य राखता येऊ शकते; रोबोटसाठी ते अशक्य आहे.

त्यामुळे या सूत्रांवरून हे लक्षात येते की, ‘रोबोटची आत्महत्या’ ही कल्पना चुकीची असली, तरी ही घटना मानवी जीवनातील ताणाचा सामना आणि त्याचे व्यवस्थापन करण्याच्या कौशल्यांच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकते.

– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा. (८.७.२०२४)