श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई
महाराष्ट्रातील अनेक शासकीय कार्यालयांत साहित्याचा घोटाळा !
मुंबई – शासकीय कार्यालयांमध्ये पैशांच्या अपहाराचे अनेक प्रकार उघड झाले आहेत; मात्र महाराष्ट्रातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या साहित्याचाही घोटाळा होत आहे. महाराष्ट्रातील विविध २२ शासकीय विभागांच्या शेकडो शासकीय कार्यालयांमध्ये मागील २५ वर्षांत २० कोटी २३ लाख ८० सहस्र रुपयांच्या शासकीय साहित्यामध्ये गैरव्यवहार आणि अफरातफर झाली असल्याचे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी वर्ष २०२२-२३ च्या राज्य वित्तव्यवस्था लेखापरीक्षा अहवालातून उघड केले आहे. नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा अहवाल सादर करण्यात आला.
राज्यात मागील २५ वर्षांत शासकीय कार्यालयांतील साहित्याच्या अफरातफरीची आणि गैरवापराची २४२ प्रकरणे झाली आहे. यामध्ये कृषी, पशूसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासकीय कार्यालयांमध्ये अफरातफरीची सर्वांधिक ४२ प्रकरणे घडली आहेत. त्या खालोखाल जलसंपदा विभाग ३२, वित्त विभाग २५, गृह विभाग २७, वने आणि महसूल २२, सार्वजनिक बांधकाम विभाग १८ अशी अपहाराची प्रकरणे उघड झाली आहेत.
मागील ५ वर्षांत महाराष्ट्रात शासकीय कार्यालयांमध्ये अफरातफर आणि गैरवापर यांची २१ प्रकरणे उघड झाली आहेत. यामध्ये १ कोटी ८२ लाख ८२ सहस्र रुपयांचा घोटाळा झाला आहे.
४६२ लाख रुपयांच्या साहित्याची चोरी !
मागील २५ वर्षांत सरकारच्या विविध २३ विभागांतील तब्बल ४६२ लाख रुपयांच्या साहित्याची चोरी झाली. शासकीय कार्यालयात साहित्याची चोरी झाल्याची एकूण १०४ प्रकरणे उघड झाली आहेत.
संपादकीय भूमिका
|