भगवान शिवाने आद्य शंकराचार्यांना आत्म्याच्या सर्वव्यापक स्वरूपाची करून दिलेली जाणीव !
एकदा आद्य शंकराचार्य गंगास्नान करून येत होते. रस्त्यामध्ये एक अस्पृश्य उभा होता. तेव्हा शंकराचार्य त्याला म्हणाले, ‘‘अरे, तू मार्गातून दूर हो.’’ तेव्हा अस्पृश्य त्यांना म्हणाला, ‘‘तुम्ही माझ्या देहाला ‘दूर हो’, असे म्हणत आहात का ? सर्व देह तर पंचभूतात्मक असतात. तुमचा आणि माझा देह सारखाच आहे, तर त्यामध्ये तुम्हाला कोणती अडचण आहे ? जर का तुम्ही माझ्या आत्म्याला ‘दूर हो’, असे म्हणत असाल, तर आत्मा नित्य शुद्ध, चैतन्यमय आणि अविनाशी आहे. सूर्याचे प्रतिबिंब मद्याच्या पात्रात पडल्यावर सूर्य अपवित्र होईल का ? दोन्ही शरिरात असणारी चैतन्यशक्ती एकच असते. तुम्ही अद्वैत सिद्धांत प्रस्थापित करण्याचे व्रत घेतले आहे, तर हा द्वैताचा संभ्रम तुमच्या मनामध्ये कशाला ?’’ तेव्हा शंकराचार्यांनी अस्पृश्याला साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाले, ‘‘तुम्ही आत्म्याच्या सर्वव्यापक स्वरूपाची मला जाणीव करून दिली आहे. तुम्हीच माझे गुरु आहात.’’ असे म्हणून ते उभे राहिले. तेव्हा त्यांच्या समोर साक्षात् भगवान शिव प्रसन्न मुद्रेत उभे होते.