IMA Apology : सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या विरोधातील वक्‍तव्‍याविषयी जाहीर क्षमायाचना सर्वत्र प्रसिद्ध केली ! – ‘आय.एम्.ए.’चे अध्‍यक्ष डॉ. अशोकन्

खासगी डॉक्‍टरांविषयी न्‍यायालयाने घेतलेल्‍या भूमिकेविषयी अप्रसन्‍नता व्‍यक्‍त केल्‍याचे प्रकरण

‘आय.एम्.ए.’चे अध्‍यक्ष डॉ. अशोकन्

नवी देहली – इंडियन मेडिकल असोसिएशनने (‘आय.एम्.ए.’ने) ‘पतंजलि आयुर्वेद लिमिटेड’ने कथित दिशाभूल करणारी विज्ञापने प्रसारित केल्‍याच्‍या प्रकरणात सर्वोच्‍च न्‍यायालयात प्रविष्‍ट केलेल्‍या याचिकेवर सर्वोच्‍च न्‍यायालयात नुकतीच सुनावणी झाली. या वेळी ‘आय.एम्.ए.’चे अध्‍यक्ष डॉ. आर्.व्‍ही. अशोकन् यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या विरोधात केलेल्‍या वक्‍तव्‍याविषयी जाहीर क्षमायाचना केली असून ती सर्वत्र प्रसिद्ध करण्‍यात आली आहे, असे ‘आय.एम्.ए.’चे अधिवक्‍ता पी.एस्. पटवालिया यांनी   न्‍यायमूर्ती हिमा कोहली आणि न्‍यायमूर्ती संदीप मेहता यांच्‍या खंडपिठाला सांगितले. या प्रकरणी ‘आय.एम्.ए.’चे अध्‍यक्ष डॉ. आर्.व्‍ही. अशोकन् यांनी एक अतिरिक्‍त प्रतिज्ञापत्र ६ जुलै या दिवशी सर्वोच्‍च न्‍यायालयात प्रविष्‍ट केले होते. या प्रकरणातील प्रतिवाद्यांना प्रतिज्ञापत्राचा अभ्‍यास करण्‍यास वेळ मिळावा, यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ६ ऑगस्‍टपर्यंत पुढे ढकलली.

१. ‘पतंजलि आयुर्वेद लिमिटेड’ने त्‍याच्‍या उत्‍पादनांविषयी कथित दिशाभूल करणारी विज्ञापने प्रसारित केल्‍याच्‍या प्रकरणात ‘आय.एम्.ए.’ने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली होती.

२. या खटल्‍याच्‍या सुनावणीच्‍या वेळी दिशाभूल करणारी विज्ञापने प्रसारित केल्‍याच्‍या प्रकरणात बाबा रामदेव यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार क्षमायाचना केली होती. त्‍यानंतर सर्वोच्‍च न्‍यायालयाने ‘आय.एम्.ए.नेही स्‍वतःचे घर ‘ठीक’ करणे आवश्‍यक आहे’, अशी टिपणी केली होती. त्‍या वेळी न्‍यायालयाने खासगी डॉक्‍टरशी करत असलेल्‍या अनैतिक कृत्‍यांविषयी भाष्‍य केले होते.

३. यावर ‘पीटीआय’ या वृत्तसंस्‍थेला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये डॉ. अशोकन् यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयाने खासगी डॉक्‍टरांविषयी घेतलेल्‍या भूमिकेविषयी अप्रसन्‍नता व्‍यक्‍त करत ‘न्‍यायालयाने घेतलेली भूमिका त्‍याच्‍या प्रतिष्‍ठेला साजेशी नाही’, असे म्‍हटले होते. यामुळे न्‍यायालयाने त्‍यांना फटकारले होते आणि जाहीर क्षमायाचना करण्‍यास सांगितले होते.