‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून देवीतत्त्व कार्यरत आहे’, या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात १९ ते २१.१.२०२४ या कालावधीत झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’त सहभागी झाले होते. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. १९.१.२०२४ या दिवशी आलेल्या अनुभूती

१ अ. ‘भवानीदेवीच्या मूर्तीच्या ओठांची हालचाल होत आहे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून देवीतत्त्व कार्यरत आहे’, असे जाणवणे : मी शिबिराच्या पहिल्या दिवशी भवानीदेवीच्या मूर्तीचे दर्शन घेतले. तेव्हा अर्ध्या मिनिटांनी मला देवीच्या ओठांची हालचाल जाणवली. मला देवीच्या मूर्तीचा ओठ आणि हनुवटीचा भाग प्रकाशमान दिसला. त्या वेळी मला जाणवले, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून देवीतत्त्व कार्यरत आहे आणि ते त्यांच्या वाणीतून अधिक कार्यरत आहे; म्हणून देवीच्या ओठांची हालचाल होत आहे. देवीने श्वास घेतल्याप्रमाणे तिच्या छातीची हालचालही होत आहे. देवीचे मुखकमल प्रसन्न आहे.’ मला ‘तेथून जाऊ नये’, असे वाटत होते.

२. २०.१.२०२४ या दिवशी आलेल्या अनुभूती

२ अ. देवीचा चेहरा सजीव भासणे : मी दुसर्‍या दिवशी भवानीदेवीचे दर्शन घेतल्यावर मला लगेचच देवीच्या ओठांची हालचाल जाणवली. तेव्हा मला तिचा चेहरा आणि मान यांचीही हालचाल जाणवली. मला तिचा चेहरा अधिक सजीव भासला.

३. २१.१.२०२४ या दिवशी आलेल्या अनुभूती

३ अ. ‘देवी बोलत आहे’, असे जाणवणे : मी तिसर्‍या दिवशी देवीचे दर्शन घेतल्यावर मला देवीचा चेहरा आणि ओठ यांची हालचाल जाणवली. ‘देवी बोलत आहे’, असे मला जाणवत होते. मला ‘तिच्या चेहर्‍याची हालचाल होत आहे आणि तिच्या कानातील डूलही हलत आहे’, असे दिसले.

३ आ. साधिकेला ही दृश्ये दिसण्यामागील देवीने सांगितलेला कार्यकारणभाव ! : मला ही दृश्ये दिसण्यामागील कार्यकारणभाव देवीला विचारल्यावर तिने सांगितले, ‘रामनाथी आश्रमात होत असलेल्या शिबिरांत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वाणी कार्यरत आहे अन् सभागृहातील व्यासपिठावर ही वाणी स्थानापन्न झाली आहे. व्यासपिठावरून बोलणारे संत आणि साधक यांच्या माध्यमातून ती वाणी त्या त्या वेळी कार्यरत होत आहे.’

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे कार्य देहातीत होत असल्याच्या संदर्भात आलेली अनुभूती

मागील शिबिराच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ व्यासपिठावर बसलेल्या असतांना मला त्यांचा चेहरा अधिक प्रकाशमान दिसत होता. २१.१.२०२४ या शिबिराच्या शेवटच्या दिवशी मी सौ. अर्पिता पाठक यांना प्रसाद घेण्याच्या वेळी भेटले होते. तेव्हा मला त्यांचा चेहरा सामान्य वाटला; मात्र नंतर त्या व्यासपिठावर बसल्या असतांना मला त्यांचा चेहरा प्रकाशमान दिसला. ‘सौ. अर्पिता यांच्या माध्यमातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे देहापलीकडचे कार्य चालू आहे’, असे मला वाटले.

मला या अनुभूती दिल्याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, ठाणे, महाराष्ट्र. (२८.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक