पंढरपूर – संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी शासकीय मूल्यांकनकर्त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे काम अत्यंत जटील असून आम्ही लवकरात लवकर दागिन्यांचे मूल्यांकन पूर्ण करून घेऊ. मूल्यांकन पूर्ण झाल्यावर भाविकांसाठी ती संपूर्ण माहिती उघड केली जाईल. यात संपूर्ण पारदर्शीपणा आम्ही ठेवू, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
गेल्या ३८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दागिन्यांचे मूल्यांकन नसल्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’ने उठवला होता आवाजविधीमंडळाच्या डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा वर्ष २०२१-२२ चा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात दागिन्यांचे मूल्यांकन झाले नसल्याचे नमूद केले. सर्वप्रथम दैनिक ‘सनातन प्रभात’ने वृत्त देऊन ही गोष्ट उघड केली. यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाने या विषयावर पत्रकार परिषद घेऊन लेखापरीक्षण, तसेच मंदिराच्या विविध अनागोंदी कारभाराविषयी आवाज उठवला होता. गेली ३ वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’ने मूल्यांकन झालेले नसल्याविषयीचे सूत्र लावून धरले होते. |
१. वर्ष १९८५ मध्ये मंदिराचे सरकारीकरण झाल्यापासून या प्राचीन दागिन्यांचे मूल्यांकन झाले नव्हते. त्यामुळे देवतांच्या प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनाचा प्रश्न जवळपास ३८ वर्षांपासून रखडलेला होता.
२. देवस्थान समितीने २८ जुलै २०२१ मध्ये शासनाकडे पत्रव्यवहार करून अधिकृत मूल्यांकन अधिकार्यांची नियुक्ती करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. यानंतर लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यावर परत एकदा २८ जुलै २०२३ आणि २७ डिसेंबर २०२३ मध्ये शासनाशी परत एकदा पत्रव्यवहार करण्यात आला होता. यानंतर मंदिरे समितीच्या सहअध्यक्षांनी १ जानेवारी २०२४ या दिवशी मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून संबंधित विभागात निवेदन दिले होते.
३. यावर शासनाने १२ जानेवारी २०२४ या दिवशी मौल्यवान दागिने, हिरे, सोने, चांदी यांचे मूल्यांकन करण्यासाठी कार्यासनाकडे शासनमान्य मूल्यांकनर्त्यांची/संस्थेची सूची उपलब्ध नाही. तरी इतर देवस्थानकडून ती घेण्यात यावी, असे उत्तर दिले आहे. (एकीकडे शासन मंदिरांचे सरकारीकरण करते आणि दुसरीकडे मौल्यवान दागिने, हिरे, सोने, चांदी यांचे मूल्यांकन करण्यासाठी शासनमान्य मूल्यांकनकर्ते नसणे, हे आश्चर्यकारक आहे ! भाविक ज्या श्रद्धेने देवाला दागिने देतात, त्यांचे योग्य मूल्यांकन होण्यासाठी अधिकृत मूल्यांकनकर्ते प्रत्येक देवस्थानासाठी असणे अपेक्षित आहे ! – संपादक)
४. यानंतर शासनाच्या निर्देशांनुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने इतर देवस्थानांशी पत्रव्यवहार करून शासकीय मूल्यांकनकर्त्यांची नियुक्ती केली आहे.
श्री. अजय केळकर, कोल्हापूर
छत्रपती शिवरायांच्या काळापासूनच्या मौल्यवान दागिन्यांचा समावेश !
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवी यांना छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, तत्कालीन संस्थानिक आदींनी मौल्यवान दागिने अर्पण केले आहेत. यामध्ये श्री विठ्ठलाचा हिर्याचा मुकुट, हिर्याचे पैंजण, श्री विठ्ठलाची सोन्याची तुळशीची माळ, सोन्याचे गोफ आदी मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे. वर्ष २०२१-२२ च्या आर्थिक अहवालामध्ये श्री विठ्ठलाचे २०३, तर श्री रुक्मिणीदेवीचे ११ दागिने असल्याचा उल्लेख आहे; परंतु दागिन्यांचा तपशील देण्यात आलेला नाही.