अन्य राष्ट्रावरील आक्रमणात मध्यस्थी करण्याचे भारतात सामर्थ्य !
नागपूर – भारतासाठी एक काळ असा होता की, समाजाच्या आतपर्यंत भ्रष्टाचार शिरला होता. भ्रष्टाचारामुळे कुणालाही नोकरी, कंत्राट, चांगली संधीही मिळत नव्हती; मात्र आता तो काळ राहिलेला नाही. आपण आज भ्रष्टाचारमुक्त भारतात असून दलालांची जात संपूर्ण नष्ट झाली आहे. ती पुन्हा कधीही डोके वर काढू शकणार नाही. यामुळे युवकांना आजच्या काळात चांगल्या संधी आहेत, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. रामदेवबाबा विद्यापिठाच्या ‘डिजीटल टॉवर’ नावाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन्, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संस्थेचे संस्थापक आणि माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित उपस्थित होते.
उपराष्ट्र्रपती पुढे म्हणाले,..
१. गुणवत्तापूर्ण शिक्षण हे चांगल्या लोकशाहीसाठी लाभदायी आहे. विकसित भारतासाठी ते साहाय्य करेल.
२. आधी जगामध्ये भारताची ओळख ‘झोपलेल्या लोकांचा देश’ अशी होती. आता भारत जागृत झाला आहे. विकासाच्या दिशेने नवनवीन क्षितिजे गाठत आहे.
३. गुंतवणूक आणि चांगल्या संधी यांसाठी ‘भारत’ हा सर्वांचा आवडता देश झाला आहे. आम्ही कधीही कुठल्या देशावर आक्रमण केले नाही; परंतु कुठल्या देशावर आक्रमण झाल्यास ‘भारताने त्यात मध्यस्थी करावी’, असे सामर्थ्य भारतात आहे.
४. भारताचा जगामध्ये डंका वाजत आहे. तरुणांसमोर अनेक संधी उपलब्ध आहेत; परंतु आम्ही केवळ सरकारी नोकरीकडेच संधी म्हणून बघतो आणि अनेक गोष्टी गमावून बसतो. तंत्रज्ञान, अंतराळ, समुद्र या क्षेत्रातही चांगल्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात ‘करिअर’ करा.