पंतप्रधान मोदी यांच्या रशिया दौर्याविषयी अमेरिकेची सावध प्रतिक्रिया
वॉशिंग्टन (अमेरिका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय रशिया दौर्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना अमेरिकेने ‘भारत आमचा सामरिक भागीदार आहे’, असे म्हटले आहे. यासह युक्रेन युद्धावर कोणताही तोडगा काढतांना संयुक्त राष्ट्रांच्या तत्त्वांचे पालन केले पाहिजे, असा संदेश अमेरिकेने भारताला मॉस्कोला देण्याचे आवाहन केले.
मोदी यांच्या मॉस्को दौर्याविषयी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, अमेरिकेचे भारतासमवेत खुले आणि प्रामाणिक संबंध आहेत. आम्हाला भारताच्या रशियाशी असलेल्या संबंधांविषयी चिंता आहे. (ही चिंता नसून हेकेखोर अमेरिकेची ही डोकेदुखी आहे ! अर्थात् भारत अमेरिकेला आता जुमानत नाही, हेही अमेरिका ओळखून आहे. – संपादक)
मिलर पुढे म्हणाले, ‘आम्ही भारताला विनंती करतो की, त्यांनी रशियाशी संबंध ठेवतांना हे स्पष्ट करावे की, युक्रेनमधील संघर्षाच्या कोणत्याही निराकरणात संयुक्त प्रयत्नांचा समावेश आहे. या उपायाने युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर राखला जाऊ शकेल.’
संपादकीय भूमिकाबाणेदार भारताने स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखल्याने स्वार्थांध अमेरिका अशा प्रकारे सावधानतेची भूमिका घेते, हे जगजाहीर आहे ! |