डाव्या पक्षांच्या आघाडीला सर्वाधिक जागा !
पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समध्ये दोन टप्प्यांत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीनंतर जेथे ‘नॅशनल रॅली’ या कट्टर राष्ट्रवादी आणि मुसलमानविरोधी पक्षाच्या मरीन ली पेन आघाडीवर होत्या; परंतु हे चित्र नंतर पालटले. मरीन ली पेन यांच्या पक्षाला १४२ जागा मिळाल्या आहेत. फ्रान्सचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या ‘एन्सेम्बल’ पक्षाला १४८ जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर डाव्या पक्षांच्या ‘नॅशनल पॉप्युलर फ्रंट’ या आघाडीने सर्वाधिक, म्हणजे १७७ जागांवर विजय मिळाला आहे. असे असले, तरी ५७७ सदस्यसंख्या असलेल्या खालच्या संसदेत २८९ हा बहुमताचा आकडा कुणालाही मिळालेला नाही.
अशा स्थितीत ‘नॅशनल पॉप्युलर फ्रंट’ सत्ता स्थापन करू शकते; परंतु त्यासाठी त्याला बहुमत सिद्ध करावे लागेल. त्यासाठी त्याला अन्य पक्षांशी युती करणे आवश्यक असून फ्रान्समध्ये ‘को-हॅबिटेशन’ची स्थिती निर्माण होऊ शकते. या स्थितीत राष्ट्राध्यक्ष एका पक्षाचा, तर पंतप्रधान दुसर्या पक्षाचा, अशी व्यवस्था आहे.
गॅब्रिएल अटल यांची त्यागपत्र देण्याची सिद्धता !
अशातच मॅक्रॉन यांच्या पक्षाचे प्रमुख नेते गॅब्रिएल अटल यांनी पदाचे त्यागपत्र देण्याची सिद्धता केली आहे. ‘फ्रान्समध्ये लवकरच जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धा (पॅरिस ओलिंपिक्स) होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या देशात ‘न भूतो, न भविष्यती’ अशी स्थिती निर्माण झाली आहे’, असे अटल यांनी म्हटले आहे. पॅरिसमध्ये २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत ओलिंपिक स्पर्धा होत आहे.
दुसरीकडे ‘राष्ट्राध्यक्ष निवडणूक निकालांवर लक्ष ठेवून आहेत. फ्रान्सच्या जनतेने दिलेल्या सार्वभौम कलाचा आदर राखला जाईल, याची निश्चिती राष्ट्राध्यक्षांकडून केली जाईल’, अशी प्रतिक्रिया मॅक्रॉन यांच्या कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे.