चुकीच्या दस्ताऐवजांचा खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी वापर केल्याचा आरोप
ठाणे, ७ जुलै (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांच्यासह ५ जणांवर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद केला आहे. १० वर्षांपूर्वी बनावट आणि चुकीचे दस्ताऐवज सिद्ध करून त्यांच्या अभिलेखात नोंदी करत त्याचा खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी वापर केला, असा आरोप या ५ जणांवर आहे. उपायुक्त जोशी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी, कळवा प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी सुरेश राजपूत, कनिष्ठ अभियंता रविंद्र कासार, मुख्य प्रशासकीय कार्यालय अधिकारी बाळू पिचड, उथळसर प्रभाग समितीचे तत्कालीन कर्मचारी गगनसिंग दानसिंग थापा या ५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.