गोवा राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा कहर : जनजीवन विस्कळित

  • नद्या, आहोळ दुथडी भरून वाहू लागले, दरडी कोसळल्या आणि छोटे पूल बुडाले

  • गोव्यात ८ जुलैला इयत्ता १२ वी पर्यंतच्या शाळांना सुटी

मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथे रस्त्यावर आलेले पाणी

पणजी, ७ जुलै (वार्ता.) – गोवा राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ जुलैच्या रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून नद्या, ओहोळ दुथडी भरून वहात आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळणे,भिंत कोसळणे, छोटे पूल वाहून जाणे, रस्ता वाहून जाणे, अशा घटना घडल्या आहेत. यामुळे गोवा राज्यातील आणि महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोव्यात काणकोण परिसरात पूरजन्य स्थिती आहे. ७ जुलै या दिवशी अवघ्या ५ घंट्यांमध्ये गोव्यात सरासरी ४ इंचांहून अधिक पाऊस कोसळला.

हंगामी पावसाने इंचाचे अर्धशतक (५० इंचांहून अधिक पाऊस) पार केले आहे. गोव्यातील धबधब्यांवर सहलीला जाण्यास वन विभागाने बंदी घातली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांतील भातशेती पाण्याखाली गेली आहे. छोट्या पुलांवरून पाणी वहात असल्याने २७ गावांचा संपर्क तुटला आहे

मुंबई-गोवा महामार्गावर काळपनाका (कुडाळ) येथील जलमय परिसरगोव्यात पावसामुळे पडझडीसह काही ठिकाणी पूरस्थिती

कळसुली येथे रस्ता वाहून गेल्याचे दृष्य

पणजी – हवामान खात्याने गोव्यात मुसळधार पावसाची चेतावणी दिल्यानुसार ६ जुलै या दिवशी रात्रीपासून राज्याला पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जुने गोवे येथे ७ घंट्यांमध्ये ६ इंचांहून अधिक पाऊस कोसळला. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे, तसेच दरडी कोसळणे, पडझड आणि छोटे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावरील वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे गावांचा संपर्कही तुटला आहे. पेडणे, डिचोली, सांखळी, वाळपई, फोंडा, कुठ्ठाळी, सांगे आणि काणकोण या भागांत झाडे आणि घरे कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. डिचोली आणि सत्तरी तालुक्यांमधील अनेक नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठाही ठप्प झालेला आहे. सत्तरी येथे पाली धबधब्यावर अडकलेल्या १५० नागरिकांची म्हादई अभयारण्यातील कर्मचारी, स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्नीशमन दलाचे सैनिक यांनी सुखरूप सुटका केली आहे. कुंडई औद्योगिक वसाहतीत भिंत कोसळून खोलीत रहाणारे ३ कामगार ठार झाले आहेत. कोन्सुआ, कुठ्ठाळी येथे मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यांमुळे ७० ते ८० मोठी झाडे उन्मळून पडली आहेत.

राज्यातील सर्व धबधब्यांवर एक आठवड्यासाठी प्रवेशबंदी !

राज्यात पावसाचा कहर चालू असल्याने वनमंत्री विश्वजीत राणे यांनी राज्यातील सर्व धबधब्यांवर एक आठवड्यासाठी प्रवेशबंदी घातली आहे. पावसाचा कहर अल्प होईपर्यंत ही बंदी कायम रहाणार असल्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.

अग्नीशमन दलाने राज्यात चालू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण घरातून बाहेर न पडण्याची चेतावणी दिली आहे. दलाने पुढे म्हटले, ‘‘ज्यांची घरे मातीची आहेत, त्यांनी विशेष काळजी घेऊन स्वत:ला आणि कुटुंबियांना सुरक्षित ठेवावे. अनेक ठिकाणी पडझड होत असल्याने आम्हाला वेळेत घटनास्थळी पोचणे शक्य होत नाही. त्यामुळे लोकांनी प्राथमिक स्तरावर काळजी घ्यावी.’’

कोने, प्रियोळ येथे दरड कोसळली

फोंडा – फोंडा-पणजी महामार्गावर कोने-प्रियोळ येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने दुपारी महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनांची मोठी रांग लागली होती. या ठिकाणी दुपारी १.३० वा पर्यंत ‘जेसीबी’ यंत्राने रस्त्यावर कोसळलेला मातीचा ढिगारा दूर करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे काम चालू होते. तत्पूर्वी फर्मागुडी ते म्हार्दाेळ रस्त्यावरील वाहतूक गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय मार्गाने वळवण्यात आली होती.

फोंडा-मडगाव रस्त्यावरील वाहतूक खोळंबली

फोंडा – बोरी येथे नाल्याचे पाणी मडगाव-फोंडा महामार्गावरून वाहू लागल्याने वाहतूक खोळंबली. प्रतिवर्ष या ठिकाणी पावसात पाणी महामार्गावरून ओसंडून वहाते. नाल्यामध्ये गाळ साचल्याने पात्र उथळ झाल्याने ही स्थिती ओढवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

गुडी, पारोडा येथील पूल पाण्याखाली गुडी, पारोडा येथील पूल पाण्याखाली गेल्याने या ठिकाणी धोकादायक स्थिती बनली आहे. वाहतूक पोलिसांनी दक्षता बाळगतांना वेळीच या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळवल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळल्या.

जुने गोवे आणि पिळर्ण येथे सर्वाधिक पाऊस

भारतीय हवामान खात्याच्या स्वयंचलीत यंत्रणेच्या नोंदीनुसार ७ जुलै या दिवशी सकाळी ८.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत ७ घंट्यांमध्ये जुने गोवे येथे सर्वाधिक ६.४१ इंच पाऊस पडला, तर पिळर्ण येथे ५ इंच पाऊस पडला. काणकोण आणि मुरगाव येथे २ इंचांहून अधिक पाऊस पडला.

पावसामुळे विजेचे ५० खांब कोसळले

वीज खात्याचे मुख्य अभियंत्रा स्टीफन फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसामुळे राज्यात विजेचे ६० खांब कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये वीज खात्याला सर्वाधिक हानी सत्तरी, सांगे आणि उसगाव या भागांत झाली आहे. ८ जुलै या दिवशी सकाळपर्यंत सर्व भागांतील वीजपुरवठा सुरळीत करण्याचा वीज खात्याचा प्रयत्न आहे.

प्रशिक्षणासाठी नियुक्त शिक्षक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांना ८ जुलैला सुटी नाही

शिक्षण खात्याने ८ जुलै या दिवशी मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पूर्वप्राथमिक ते इयत्ता १२ वीपर्यंतचे विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग यांना एक दिवसाची सुटी घोषित केली आहे; मात्र ८ जुलै या दिवशी प्रशिक्षणासाठी नेमणूक झालेल्या शिक्षकांना सुटी असणार नाही, अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली आहे.

उच्च शिक्षण विभागाचे संचालक भूषण सावईकर म्हणाले, ‘‘८ जुलै या दिवशी केवळ इयत्ता १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुटी घोषित झालेली आहे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आलेली नाही.’’

राज्यातील इतर घटना

१. अडवालपाल येथील नवीन पूल पाण्याखाली गेल्याने धनगर वाड्यावरील लोकांचा संपर्क तुटला आहे.

२. होंडा, सत्तरी येथे नागरी पुरवठा खात्याच्या गोदामाचे छप्पर चक्रीवादळाने उडाल्याने गोदामातील गहू आणि तांदुळ भिजला आहे. यामुळे लाखो रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

३. सांखळी येथील वाळवंटी नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत ३.६ मीटर, तर बाजारातील नाल्यातील पाण्याच्या पातळीत ३.२ मीटर वाढ झाली आहे. बाजारात पंपाद्वारे पाण्याचा उपसा चालू करण्यात आला आहे.

४. साळावली धरण भरून वाहू लागले, अशी माहिती जलस्रोत खात्याने दिली आहे.

मालपे-न्हयबाग राष्ट्रीय महामार्ग ६६ वर पुन्हा दरड कोसळली

पेडणे – १५ दिवसांपूर्वी मालपे-न्हयबाग राष्ट्रीय महामार्ग ६६ वर दरड कोसळून काही प्रमाणात संरक्षक भिंतही कोसळली होती. आता तेथे पुन्हा दरड कोसळल्याने हा बगलमार्ग राष्ट्रीय महामार्गावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आणि पूर्वीचा जुना राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.