Hathras Stampede : चेंगराचेंगरीत झालेल्‍या मृत्‍यूंमुळे मी पुष्‍कळ व्‍यथित ! – भोलेबाबा

हाथरस (उत्तरप्रदेश) येथील चेंगराचेंगरीचे प्रकरण

भोलेबाबा

हाथरस (उत्तरप्रदेश) – येथील रतीभानपूरमध्‍ये असलेल्‍या फुलराई गावात भोले बाबा यांच्‍या सत्‍संगानंतर झालेल्‍या चेंगराचेंगरीमध्‍ये १२१ लोकांचा मृृत्‍यू झाला होता. २ जुलैला घडलेल्‍या या घटनेनंतर या प्रकरणी कार्यक्रमाचे आयोजक देवप्रकाश मधुकर आणि अन्‍य यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. मधुकर यांना देहलीतून अटक करण्‍यात आली आहे. या घटनेवर आता भोलेबाबांनी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली आहे. ते म्‍हणाले की, या घटनेमुळे मी पुष्‍कळ व्‍यथित झालो आहे. देव आम्‍हाला या धक्‍क्‍यातून सावरण्‍याची शक्‍ती देवो.

ते पुढे म्‍हणाले की, आम्‍हाला प्रशासन आणि शासन यांवर विश्‍वास आहे. जे समाजकंटक आहेत, त्‍यांना शिक्षा होईल. आम्‍ही मृत झालेल्‍यांच्‍या कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य करत आहोत. माझ्‍या संवेदना मृत्‍यू झालेल्‍यांच्‍या कुटुंबियांसह कायम आहेत.

घायाळ झालेल्‍यांवर उपचार चालू करण्‍यात आले आहेत. घटनेमागील कारणांचा प्राथमिक अभ्‍यास करून विशेष अन्‍वेषण पथकाने १५ पानांचा प्राथमिक अहवाल बनवला आहे. यामध्‍ये संपूर्ण ठपका प्रशासन आणि आयोजक यांवर ठेवण्‍यात आला आहे. आवश्‍यकता पडल्‍यास भोलेबाबा यांना तपासात सामावून घेतले जाईल.

कशी झाली चेंगराचेंगरी ?

कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा सहस्रो लोक अधिक आले होते. भोले बाबांनी सत्‍संगाचे स्‍थळ सोडल्‍यानंतर त्‍यांचा स्‍पर्श झालेली माती गोळा करण्‍याकरता गर्दी जमली असता चेंगराचेंगरी झाली. या सगळ्‍यात अनेक भाविक जवळच्‍या नाल्‍यात पडले.