उरुळी कांचन (जिल्हा पुणे) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा उरुळी कांचनमध्ये दुपारी आला. परंपरेनुसार हा दुपारचा विसावा उरुळी कांचन ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये करावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्याकरता पालखी सोहळ्यातील नगारा रथ अडवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पालखी विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यानंतर गावकर्यांनी निषेधाच्या घोेषणा केल्या. पालखी सोहळा यवत मुक्कामी पोचल्यानंतर पालखी सोहळा विश्वस्तांनी निषेध सभा घेतली. वारकर्यांकडून पोलिसांकडे पालखी सोहळ्याला अडथळा निर्माण करणार्या ग्रामस्थांवर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
उरुळी कांचनचे सरपंच अमित कांचन म्हणाले की, ५६ वर्षांची परंपरा म्हणून दुपारच्या विसाव्याची सेवा आमच्याकडून व्हावी; म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. गुन्हा नोंद होणे म्हणजे आमच्यासह ग्रामस्थांवर अन्याय आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये सिलिंडरला आग !
सासवड-जेजुरी रस्त्यावरील वाळुंज फाटा या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा मार्गस्थ होत असतांना दिंडी क्र. ७८ मधील वारकर्यांचा स्वयंपाक चालू असतांना घरगुती सिलिंडरने पेट घेतला. त्वरित वारकर्यांनी वाळू टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. वारीसमवेत असणार्या अग्नीशमनदलास पाचारण केले. अग्नीशमनदलाच्या जवानांनी पेटलेल्या सिलिंडरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली.