वर्ष २०२४ च्या युरोपियन युनियनच्या निवडणुकांमुळे युरोपात राजकीय पालट घडून येतील. युरोपियन राष्ट्रवादाचे नवे वारे वहातील. या निवडणुकांचे परिणाम भारत-युरोपमधील व्यापार, आंतरराष्ट्रीय संबंध आणि द्विपक्षीय सहकार्य यांवर होतील. युरोपियन युनियन हा भारताच्या सर्वांत मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. त्यामुळे नवीन राजकीय घडामोडी, युरोपियन युनियनची व्यापारी धोरणे आणि बाजार प्रवेशाच्या नियमांचा भारत-युरोप आर्थिक संबंधांवर मोठा प्रभाव पडेल. राष्ट्रीय सार्वभौमत्वावर जोर देणारा ‘ब्रदर्स ऑफ इटली’ हा राजकीय पक्ष आणि त्याचा युरोपियन युनियनमध्ये वाढलेला प्रभाव हा भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
१. युरोपियन युनियनची निवडणूक पद्धत
प्रत्येक ५ वर्षांनी होणारी युरोपियन युनियनची निवडणूक ही आंतरराष्ट्रीय राजकारणातील मोठी घडामोड आहे. युरोपियन संसदेची रचना आणि वाटचाल या निवडणुका निश्चित करतात. वर्ष २०२४ मधील युरोपियन युनियनच्या निवडणुकांचे निकाल येणार्या ५ वर्षांत युरोपात घडणार्या मोठ्या पालटांची नांदी आहे. युरोपियन युनियनच्या निवडणुका एका विशिष्ट कालावधीत सर्व सदस्य राज्यांमध्ये विशिष्ट दिवस ठरवून घेतल्या जातात. प्रत्येक सदस्य राज्य युरोपियन युनियनच्या निवडणुकांसाठी स्वतःची निवडणूक प्रणाली वापरतो. एखाद्या पक्षाने जिंकलेल्या जागांची संख्या त्याला मिळालेल्या मतांच्या संख्येच्या प्रमाणात असते. दोन मुख्य प्रकारच्या निवडणूक प्रणालींचा वापर या निवडणुकांच्या वेळी होतो.
अ. बंद सूची प्रणाली : यात मतदार वैयक्तिक उमेदवाराऐवजी पक्षाला मते देतात. पक्ष नंतर त्यांच्या पूर्वनिर्धारित सूची क्रमानुसार उमेदवारांना जागा वाटप करतात. ही प्रणाली स्पेन आणि युनायटेड किंगडम (ब्रेक्झिटपूर्वी) यांसह अनेक सदस्य देशांद्वारे वापरली जाते.
आ. ओपन लिस्ट सिस्टम (खुली सूची प्रणाली) : यात मतदारांना पक्षाच्या सूचीतील वैयक्तिक उमेदवार निवडण्याची अनुमती असते. यात पक्षापेक्षा उमेदवाराकडे पाहून मतदान केले जाते. स्वीडन आणि फिनलंड यांसारखे देश ही प्रणाली वापरतात.
युरोपियन युनियन निवडणुकांसाठी प्रचाराचा कालावधी हा राजकीय पक्षांसाठी त्यांचे विचार व्यक्त करण्याचा महत्त्वपूर्ण कालावधी असतो. विविध राजकीय पक्ष हे साम्यवादी, मध्यवर्ती आणि राष्ट्रवादी गटांपर्यंत युरोपियन युनियनच्या भविष्यासाठी त्यांच्या अजेंड्याची रूपरेषा देऊन मतांसाठी स्पर्धा करतात. मतदानाचा कालावधी संपल्यानंतर मतांची मोजणी केली जाते आणि राष्ट्रीय अन् युरोपीय स्तरावर निकाल संकलित केले जातात. जागा वाटप हे प्रत्येक पक्षाला मिळालेल्या मतांच्या प्रमाणावर आधारित आहे. निवडणुकीचे निकाल निश्चित झाल्यानंतर, युरोपियन संसदेचे निवडून आलेले सदस्य सामान्यत: सामायिक विचारधारा आणि धोरणात्मक उद्दिष्टांवर आधारित राजकीय गटांशी युती करतात. हे राजकीय गट निवडणूक प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, निर्णयांवर प्रभाव पाडतात आणि संसदेच्या धोरणात्मक कार्यक्रमाला आकार देतात.
२. युरोपियन संसदेविषयीची माहिती
विविध विचारधारांच्या ७ युती सध्या युरोपियन संसदेत आहेत. वर्ष २०२४ च्या युरोपियन संसदेत युरोपियन युनियनच्या सदस्य राज्यांच्या किमान एक चतुर्थांश भागातून राजकीय गटांमध्ये किमान २३ सदस्य असणे आवश्यक आहे. संसदेतील सर्वांत मोठे दोन गट, म्हणजे ‘मध्य-उजवे युरोपियन पीपल्स पार्टी’ (EPP)आणि ‘मध्य-डावे सोशालिस्ट अँड डेमोक्रॅट्स’ (S&D). ‘मध्य-उजवे युरोपियन पीपल्स पार्टी’ने १७७ जागा मिळवल्या, तर ‘मध्य-डावे सोशालिस्ट आणि डेमोक्रॅट्स’ला १४४ जागा मिळाल्या. संपूर्ण युरोपमधील वैविध्यपूर्ण राजकीय आवश्यकतांचे नेतृत्व करून युरोपियन युनियनची धोरणे आणि कायदे सिद्ध करण्यात हे गट महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
३. इटलीच्या अतीउजव्या पक्षाचे प्राबल्य वाढण्यामागील कारण
नुकत्याच झालेल्या युरोपियन निवडणुकांमध्ये इटलीच्या अतीउजव्या नेत्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा देशांतर्गत, तसेच युरोपियन युनियनमध्ये राजकीय प्रभाव लक्षणीय वाढल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार मेलोनी यांच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाने वर्ष २०२२ पेक्षा २ टक्के मते अधिक मिळवली आहेत. जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वाखाली ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्षाने एक मजबूत ‘अतीउजवा राष्ट्रवादी पक्ष’ म्हणून युरोपियन राजकारणात स्वतःचे स्थान बळकट केले आहे. त्यांचा ‘अजेंडा’ (कार्यसूची) राष्ट्रीय सार्वभौमत्व जपणे, ‘इमिग्रेशन’ला (स्थानांतराला) आळा घालणे आणि युरोपियन युनियनसमोर असणार्या आव्हानांना आळा घालणे आहे. मेलोनी यांचे नेतृत्व पारंपरिक कौटुंबिक मूल्ये, कायदा-सुव्यवस्थेविषयक कठोर भूमिका अन् इटालियन कामगारांना प्राधान्य देणारी आर्थिक धोरणे या मुद्यांवर आधारित आहे. युरोपियन युनियन निवडणुकांमध्ये यांच्या पक्षाला मिळालेले लक्षणीय जनमत हे इटालियन मतदारांमध्ये वाढत्या राष्ट्रप्रेमाला अधोरेखित करणारे आहे.
अलीकडच्या युरोपियन निवडणुकांमध्ये जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील इटलीचा अतीउजवा पक्ष ‘ब्रदर्स ऑफ इटली’ हा एक महत्त्वपूर्ण ‘युरोपियन शक्ती’ म्हणून उदयास आल्याचे दिसून येत आहे. युरोपियन संसदेत इटलीकडे ७६ जागा आहेत आणि इटलीच्या ब्रदर्सने या जागांपैकी २४ जागा मिळवल्या आहेत. ‘ब्रदर्स ऑफ इटली’चा अजेंडा राष्ट्रवाद, राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि ‘इमिग्रेशन’ नियंत्रणांवर कडक लक्ष केंद्रित आहे. ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाचा उदय युरोपियन युनियनमधील मध्यवर्ती आणि डावीकडे झुकलेल्या पक्षांचा पारंपरिक प्रभावाला मोठा आव्हान देणारा ठरणार आहे; कारण या पक्षामुळे युरोपियन युनियनच्या भविष्याची दिशा ठरणार आहे. सत्तेवर अतीउजवे बसणार कि मध्यवर्ती विचारांची युती ? हे हा पक्ष कोणत्या गटाशी आघाडी करणार, यावरून ठरणार आहे.
४. अतीउजव्या पक्षांचे वर्चस्व वाढण्यामागील कारण
युरोपियन संसदेत ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाचे सदस्य युरोपियन राष्ट्रवादाला बळकट करण्याची शक्यता आहे. ‘सदस्य राष्ट्रांवरील युरोपियन युनियनचा अधिकार न्यून करण्यासाठी, सीमा सुरक्षा वाढवण्यासाठी आणि सामूहिक युरोपियन युनियनच्या निर्णयांपेक्षा राष्ट्रीय हितांना प्राधान्य देणार्या निर्णयांची बाजू घेतील’, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या भूमिकेमुळे विशेषत: ‘इमिग्रेशन’, आर्थिक नियम आणि राष्ट्रीय सार्वभौमत्व यासंबंधी महत्त्वपूर्ण वादविवाद येणार्या काळात युरोपियन संसदेत पहायला मिळू शकतात. अतीउजव्या पक्षांची या निवडणुकांमधील दमदार कामगिरी संपूर्ण युरोपमध्ये उजव्या विचारसरणीच्या वाढत्या प्रवृत्तीचे संकेत आहेत. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन या मध्य-उजव्या ‘युरोपियन पीपल्स पार्टी’ (ईपी)च्या आहेत. युरोपियन युनियनची धोरणे सिद्ध करण्यात आणि सदस्य राज्यांमध्ये निर्णयांची कार्यवाही करण्यात त्यांची आघाडी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. लेयन यांचे नेतृत्व स्थिरता, आर्थिक वाढ आणि युरोपीय एकता वाढवण्यावर भर देते, तर मरीन ले पेन या फ्रान्सच्या अतीउजव्या ‘नॅशनल रॅली’ पक्षाच्या नेत्या असून त्या राष्ट्रवाद, ‘इमिग्रेशन’संबंधीची कठोर धोरणे आणि युरोपियन युनियनमध्ये मोठ्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे समर्थन करतात. पेन यांच्या पक्षानेही या वेळी चांगली कामगिरी केल्याने मेलोनी यांच्यासमवेत ‘नॅशनल रॅली’ एक प्रभावशाली दबावगट बनवू शकतो. यामुळेच इटलीच्या अत्यंत उजव्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्षाच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ‘किंगमेकर’ (नियंत्रण ठेवणार्या) म्हणून उदयास आल्या आहेत. वॉन डर लेन आणि ले पेन यांचे पक्ष युरोपियन युनियनमध्ये स्वतःचा प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने मेलोनी यांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न करत आहेत. युरोपियन संसदेतील शक्तीचे संतुलन आणि युरोपियन युनियनच्या प्रशासन संरचनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेलोनी यांचे समर्थन आवश्यक आहे.
५. ‘ब्रदर्स ऑफ इटली’चे भारताच्या दृष्टीने महत्त्व
‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाच्या वाढत्या प्रभावामुळे ‘डिजिटल परिवर्तन’, आतंकवादविरोधी धोरण आणि जागतिक आरोग्य उपक्रमांसह विविध आघाड्यांवर युरोपियन युनियन अन् भारत यांचे सहकार्य मजबूत होऊ शकते. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील राजकीय संबंधही या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावतात. मेलोनींसह युरोपियन नेत्यांशी असलेला मोदींचा संपर्क यामुळे वर्ष २०१४ नंतर आपले व्यापार, संरक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांसारख्या क्षेत्रात युरोपाशी सहकार्य वाढले आहे. भारत आणि प्रमुख युरोपियन देशांमधील चांगले राजकीय संबंध, युरोपातील राजकीय पालटांमुळे भारतावर होणारे प्रतिकूल परिणाम न्यून करण्यास साहाय्य करू शकतात आणि भारत अन् युरोप यांच्यातील परस्पर सहकार्य आणि वाढीसाठी प्रेरक ठरू शकतात.
– शांभवी थिटे, देहली. (लेखिका जवाहरलाल नेहरू विद्यापिठात ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयात ‘पीएच्.डी.’ करत आहेत.)