कलियुगातील संजीवनी असलेल्या गुरुकृपायोगामुळे साधक स्वतःच्या जीवनात विविध योग शीघ्रतेने साध्य करू शकणे !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विशद केलेला ‘गुरुकृपायोग’ ही एक प्रकारची किमयाच असल्याची अनुभूती येत आहे. ‘त्यांनी केवळ गुरुकृपेने सर्व योगांच्या अनुभूतींची वाट मोकळी करून दिली आहे’, असे अनुभवण्यास येते. ते कसे ?, ते पाहूया !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. गुरुकृपायोगामुळे जिवाला आत्मस्वरूपाची जाणीव होणे

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

गुरुकृपायोग श्री गुरूंच्या कृपेने जिवाला तो ‘जीव’ नसून ‘शिव’च असल्याची जाणीव (आत्मस्वरूपाची जाणीव) करून देतो, म्हणजेच अनुभूती देतो.

अ. गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधना सांगितली आहे.

आ. वर्तमानकाळानुसार स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन यांची प्रक्रिया प्राधान्याने सांगितली आहे.

इ. अष्टांगातील अन्य अंगेही पूर्ण करत राहिल्यास गुरुकृपायोगाची अनुभूती येते.

२. ‘योग’ आणि ‘स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन’ एकच

अ. ‘योग’ शब्दाचा अर्थ ‘योगश्चित्तवृत्तिनिरोधः ।’

(पातञ्जलयोगदर्शन, समाधिपाद, सूत्र २)

(अर्थ : ‘चित्तवृत्तीचा निरोध’ म्हणजे योग.)

आ. ‘योग’ या शब्दाचा अर्थ चित्तवृत्तींचा निरोध, म्हणजे चित्तवृत्तींची शुद्धता, निर्मळता प्राप्त करणे, असा आहे.

इ. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठीचे सर्व प्रयत्न चित्तवृत्तींची शुद्धता आणि निर्मळता प्राप्त करून देतात. एका प्रकारे ‘योग’ साध्य करून देतात.

३. गुरुकृपायोगाच्या अंतर्गत साधना केल्याने विविध योगांच्या पालटलेल्या व्याख्या

अन्य योगमार्गांनी साधना करतांना चित्तशुद्धीचे विशेष प्रयत्न न करता त्या त्या मार्गाची साधना केली जाते. तेव्हा साधनेचा कालावधी अधिकाधिक असतो; मात्र गुरुकृपायोगाच्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन प्राधान्याने केल्यामुळे चित्त शुद्ध होऊन योग साधल्याने नंतर भक्ती, कर्म, ज्ञान, ध्यान जे काही करू त्यांद्वारे ईश्वरप्राप्ती सहज आणि अल्प कालावधीत शक्य होते. कलियुगातील गुरुकृपायोगाची महती अगाध आहे. कलियुगातील ‘संजीवनी’ म्हणजे ‘गुरुकृपायोग’ होय. कलियुगातील ‘मोक्षमार्ग’ म्हणजे ‘गुरुकृपायोग’ होय.

३ अ. कर्मयोग (पूर्वीची व्याख्या) : कर्मांच्या माध्यमातून जिवाच्या शिवाशी ऐक्याचा अनुभव घेणे, म्हणजे कर्मयोग साधणे. (या साधनेसाठी ३० ते ५० वर्षे लागू शकतात.)

३ अ १. कर्मयोग (गुरुकृपायोगानुसार व्याख्या) : गुरुकृपायोगानुसार साधना करत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाद्वारे चित्तशुद्धी करून (म्हणजे पहिले योग साध्य करून) केलेल्या सत्कर्मांच्या माध्यमांतून जिवाने परमात्म्याशी ऐक्याची अनुभूती घेणे, म्हणजे कर्मयोग साधणे. (या साधनेसाठी २० ते २५ वर्षे लागू शकतात.)

गुरुकृपायोगाच्या अंतर्गत चित्तशुद्धीद्वारे योग साधत व्यष्टी आणि समष्टी साधनेद्वारा धर्मशास्त्र पालनासह सत्सेवा आणि विविध धर्मकर्म करून जिवाने शिवाच्या ऐक्याची अनुभूती घेणे, म्हणजे ‘कर्मयोग’.

३ आ. ज्ञानयोग (पूर्वीची व्याख्या) : ज्ञानाच्या माध्यमांतून जिवाच्या शिवाशी ऐक्याचा अनुभव घेणे, म्हणजे ज्ञानयोग साधणे. (या साधनेसाठी तळमळीने या जन्मांत प्रयत्न केल्यास ३० ते ४० वर्षे लागू शकतात.)

३ आ १. ज्ञानयोग (गुरुकृपायोगानुसार व्याख्या) : स्वभावदोष तथा अहं यांच्या निर्मूलनाद्वारे चित्तशुद्धी करून (म्हणजे पहिले योग साध्य करून) ज्ञानाची उपासना केल्यास ज्ञानयोगाद्वारे जीव-शिव ऐक्याची अनुभूती येणे. (या साधनेसाठी काही वर्षांपासून १५ ते २० वर्षे लागू शकतात.)

गुरुकृपायोगाच्या अंतर्गत चित्तशुद्धीद्वारे योग साधत व्यष्टी आणि समष्टी साधना यांद्वारे कार्यानुमेय आवश्यक, तसेच स्वरूपाविषयी ज्ञानप्राप्ती होऊन जिवाने आपल्या ब्रह्म स्वरूपाची (परमात्म्याशी एकरूपतेची) अनुभूती घेणे म्हणजे ‘ज्ञानयोग’.

३ इ. भक्तीयोग (पूर्वीची व्याख्या) : भक्तीच्या माध्यमातून जिवाचा भगवंताशी ऐक्याचा अनुभव घेणे, म्हणजे भक्तीयोग साधणे. (या साधनेसाठी तळमळीने या जन्मात प्रयत्न केल्यास २५ ते ३० वर्षे लागू शकतात.)

३ इ १. भक्तीयोग (गुरुकृपायोगानुसार व्याख्या) : गुरुकृपायोगानुसार साधना करत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाद्वारे चित्तशुद्धी करून (म्हणजे पहिले योग साध्य करून) भावभक्तीच्या प्रयत्नांनी जिवाने भगवंताशी ऐक्याचा अनुभव घेणे, म्हणजे भक्तीयोग साधणे. (या साधनेसाठी काही वर्षांपासून १५ ते २० वर्षे लागू शकतात.)

गुरुकृपायोगाच्या अंतर्गत चित्तशुद्धीद्वारे योग साधत व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना भावभक्तीच्या प्रयत्नांद्वारे भगवंताशी ऐक्याची अनुभूती घेणे, म्हणजे ‘भक्तीयोग’.

४. याप्रमाणे ध्यानयोग, हठयोग, कुंडलिनीयोग असे सर्वच योग चित्तशुद्धी करून प्रयत्न केल्याने सहज आणि शीघ्र साध्य होतात.

५. पूर्वीच्या व्याख्येनुसार विविध योगमार्गांनी साधना करणे आणि गुरुकृपायोगातील व्याख्येनुसार विविध योगमार्गांनी साधना करणे यांद्वारे साधनेत प्रगती होण्यास लागणार्‍या कालावधीचा तुलनात्मक तक्ता

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१३.९.२०२३)