इंद्रायणी नदीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवावा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आळंदी (जिल्हा पुणे) – आषाढी वारी सोहळा, कार्तिकी एकादशी यांव्यतिरिक्त वर्षभर भाविक आळंदीमध्ये येतात. भक्तीभावाने पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात. याची नोंद घेत प्रशासनाने पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदी येथे आले होते. त्यांनी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन इंद्रायणी नदी घाट परिसराची पहाणी केली, तेव्हा ते बोलत होते.

८०० कोटी रुपयांचा निधी !

इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचे वचन मी दिले आहे. नदी प्रदूषणमुक्तीसाठी नगरविकास विभागाने ८०० कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे नदीसुधार योजनेचे काम लवकरच चालू होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

तुळशी वृंदावन वास्तूशिल्पाचे उद्घाटन !

आळंदी नगरपालिका निधीतून उभारण्यात आलेल्या ‘तुळशी वृंदावन वास्तूशिल्पा’चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी अंतर्गत ‘वारकर्‍यांसाठी नि:शुल्क आरोग्य शिबिरा’चा प्रारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन’ यांच्या वतीने वारकर्‍यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले.

संपादकीय भूमिका

इंद्रायणी, चंद्रभागा या पवित्र नद्या कायमस्वरूपी स्वच्छ रहाण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे अपेक्षित !