लातूर येथील ‘नीट’ घोटाळ्यातील गंगाधर याला पोलिसांनी अटक केल्याचा त्याच्या पत्नीचा दावा !

लातूर – ‘माझ्या पतीला २५ जून या दिवशी उत्तराखंड पोलिसांनी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी कह्यात घेतले आहे. यानंतर मी त्यांच्याशी बोलू शकले नाही, माझा नवरा सध्या कुठे आहे, हे मला ठाऊक नाही. मला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काहीही माहिती नाही, अशी माहिती गंगाधर यांच्या पत्नीने सांगितली आहे. ‘नीट’ घोटाळ्याप्रकरणी लातूर येथील जिल्हा परिषदेच्या २ शिक्षकांना अटक करण्यात आली आहे, तसेच या प्रकरणातील आणखी ३ आरोपी अद्याप फरार आहेत.

गंगाधर गुंडे बिहारमधील काही लोकांच्या संपर्कात होता आणि नीट पेपरफुटी घोटाळ्यात त्याचा मोठा हात असल्याचा आरोप आहे. आरोपी शिक्षक जाधव आणि पठाण यांच्याकडून पैसे घेऊन ते देहलीपर्यंत पोचवणारा उमरगा, आयटीआयमधील पर्यवेक्षक इरन्ना कोनगलवार आणि देहली येथील दलाल गंगाधर हे ३ आरोपी अद्याप फरार आहेत. गंगाधर हा मूळचा मराठवाड्याचा असून उत्तराखंडमध्ये लपून बसला आहे, असे समजते.