पुणे येथील ‘ससून’मधील रुग्णांना सर्व प्रकारची औषधे रुग्णालयातच मिळणार !

‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ सेवा देणार

पुणे – ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’तील रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागू नयेत, औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी औषध खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ‘ससून’मध्ये येणार्‍या रुग्णांना आता बाहेरून औषधे आणावी लागणार नाहीत’, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी ‘रुग्णांना बाहेरील औषधे (झिरो प्रिस्क्रिप्शन) लिहून देऊ नये’, असा आदेश आधुनिक वैद्यांना देण्यात आला होता.

रुग्णालयामध्ये सर्व प्रकारची औषधे मिळत नाहीत, अशा तक्रारी काही दिवसांपूर्वी रुग्णांनी केल्या होत्या. एका निवासी आधुनिक वैद्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे आणायला सांगितल्याची चित्रफीत सामाजिक प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे ‘ससून’मध्ये औषधे का मिळत नाहीत ? आधुनिक वैद्य बाहेरील औषधे का लिहून देतात ? असे प्रश्न निर्माण झाले होते. यामुळे आता रुग्णालयातील उपलब्ध औषधे लिहून द्यावीत, तसेच ‘बाहेरून औषध आणा’, अशी चिठ्ठी रुग्णांना लिहून देऊ नये, असा आदेश प्रशासनाने काढला होता.

रुग्णालयातच औषधे मिळावीत, यासाठी औषध खरेदीचा निर्णय घेण्यात आला. त्यातील काही औषधांचा पुरवठा झालेला आहे, तर काही औषधांचा पुरवठा १५ दिवसांमध्ये होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.