१. परात्पर गुरु डॉक्टरांना चित्रकला, नृत्य, गायन, वादन इत्यादींच्या संदर्भात सूक्ष्मातील इतके ज्ञान कसे आहे ?
उत्तर : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधना केल्याने त्यांची आध्यात्मिक उन्नती झाली आहे. त्यांचे मन आणि बुद्धी हे विश्वमन अन् विश्वबुद्धी यांच्याशी एकरूप झाले आहे. त्यामुळे त्यांना विविध घटकांतील स्पंदने, योग्य-अयोग्य इत्यादी लगेचच कळते.
२. अनेक कलाकारांचे गायन, वादन, नृत्य या कलांत कौशल्य असते. ते ऐकणार्या आणि पहाणार्या व्यक्तींना अनेक अनुभूती येतात; मात्र त्या कलाकारांचे चारित्र्य चांगले नसते. ते मद्यपान, धूम्रपान इत्यादी करत असतात. असे का ?
उत्तर : गायन, वादन, नृत्य इत्यादींपैकी कोणतीही कला ‘साधना’ म्हणून आत्मसात करणे आवश्यक असते. कलेच्या माध्यमातून कुंडलिनी जागृत होऊन तिचा प्रवास स्वाधिष्ठान चक्रापर्यंत होतो. स्वाधिष्ठान चक्रापर्यंत उन्नती झाल्यानंतर त्या व्यक्तीसाठी दोन मार्ग खुले असतात. एक मार्ग पद, पैसा आणि प्रसिद्धी यांकडे नेणारा असतो, तर दुसरा आत्मोन्नती, उच्च आध्यात्मिक अनुभूती यांकडे नेणारा असतो. त्यांपैकी योग्य मार्ग निवडण्यासाठी ‘गुरु किंवा गुरुकृपा’ यांची आवश्यकता असते. काही कलाकार गुरुकृपेमुळे या दोन्हीमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करतात, तर काही जणांचा तोल ढळतो. असे असले, तरी हे कलाकार साधना म्हणून त्यांची कला जोपासत असतात. त्यामुळे गायन, वादन आदी करतांना ते ईश्वरी तत्त्वाशी काही प्रमाणात एकरूप होऊन जातात. त्यामुळे सादरीकरणाच्या वेळी उपस्थितांना आनंद मिळणे, एकाग्रता साधणे इत्यादी अनुभूती येतात. कलेच्या सादरीकरणानंतर कलाकारांची ईश्वरी तत्त्वाशी असलेली एकरूपतेची अवस्था ढळते. ते कलाकार पद, पैसा आणि प्रसिद्धी यांच्यामागे असतात. काही जणांना प्रारब्धानुरूप पैसा आणि प्रसिद्धी मिळते, तसेच काही वाईट सवयीही लागतात. यावरून गुरूंचे जीवनातील महत्त्व स्पष्ट होते.
– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२२)