परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अवतारी वैशिष्ट्ये !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. पृथ्वीवर धर्मसंस्थापना करण्यासाठी श्रीविष्णूने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात अवतार धारण केलेला असणे

पृथ्वीवर धर्मसंस्थापना करण्यासाठी श्रीविष्णूने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात अवतार धारण केलेला आहे.

१ अ. महर्षींच्या कृपेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील दिव्यत्व आणि अवतारत्व प्रगट होऊ लागणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील दिव्यत्व आणि अवतारत्व महर्षींच्या कृपेने प्रगट होऊ लागले आहे. त्यामुळे केवळ साधकांनाच नव्हे, तर समाजातील हिंदुत्वनिष्ठ आणि पृथ्वीवरील निसर्ग यांनाही त्यांचे दिव्यत्व अन् अवतारत्व यांची प्रचीती येत आहे.

१ आ. अधिवेशनामध्ये सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दिव्यत्व अन् अवतारत्व अनुभवण्यास मिळाल्याने त्याचा उल्लेख त्यांच्या बोलण्यातून करणे :  गोव्यातील रामनाथ देवस्थानातील सभागृहात १२ जून ते १८ जून २०२२ या कालावधीत झालेल्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या’ वेळी अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी त्यांचे मनोगत व्यक्त करत असतांना किंवा त्यांचा विषय मांडत असतांना विष्णुस्वरूप किंवा श्रीकृष्णस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भावपूर्ण वंदन करून त्यांचे बोलणे आरंभ करत होते. त्याचप्रमाणे अनेकांनी त्यांच्या हिंदुत्वरक्षणाच्या कार्यात मिळालेले यश किंवा धर्मसेवा आणि साधना करत असतांना आलेल्या अनुभूतींचे संपूर्ण श्रेय परात्पर गुरूंच्या चरणी सहजभावाने अर्पण केले. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले हिंदुत्वनिष्ठ श्री. पी. टी. राजू, श्री. दुर्गेश परुळकर आणि अधिवक्ता श्री. उमेश शर्मा यांनी त्यांच्याकडून साधना करवून घेण्याचे संपूर्ण श्रेय परात्पर गुरुदेवांच्या चरणी अत्यंत भावपूर्णरित्या अर्पण केले. यावरून हे लक्षात येते की, समाजातील हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी हे जरी विविध देवतांची उपासना करत असले, तरी त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये काळानुसार जागृत झालेल्या श्रीविष्णुतत्त्वाची, गुरुतत्त्वाची आणि दिव्यत्वाची सतत अनुभूती येते. यावरून हे सिद्ध होते की, परात्पर गुरुदेवांच्या अवतारी कार्यात दिव्यलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ हे अवतारांच्या व्यूहातील (टीप) एक अविभाज्य घटकच आहेत.

टीप – जेव्हा श्रीविष्णूचे अवतार पृथ्वीवर जन्माला येतात, तेव्हा त्यांचे विष्णुलोकातील भक्तही पृथ्वीवर जन्माला येऊन त्यांच्या अवतारी कार्यात सहभागी होतात. असे प्रत्येक अवताराच्या वेळी घडते. याला ‘अवतारासह ‘व्यूह’ पृथ्वीवर अवतरणे’, असे म्हणतात. अशीच प्रक्रिया हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यामध्ये सहभागी झालेले धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या संदर्भात घडत असल्यामुळे त्यांना परात्पर गुरुदेवांचे दिव्यत्व आणि अवतारत्व अनुभवण्यास मिळत आहे. त्यामुळे परात्पर गुरुमाऊलींचा उल्लेख केल्यावर किंवा केवळ त्यांचे मनोमन स्मरण केल्यावरही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांची भावजागृती होते.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ईश्वराप्रमाणे नामानिराळे राहून कार्य करणे

परात्पर गुरुदेव अहंशून्य परमहंस अवस्थेत असल्यामुळे जरी ईश्वरेच्छेने त्यांचे अवतारत्व प्रगट होऊन अनेकांना त्यांच्या दिव्यत्वाची किंवा अवतारत्वाची प्रचीती येत असली, तरी ते त्याचा कुठेही उल्लेख करू इच्छित नाहीत. यावरूनच ‘भगवंत नामानिराळा राहून कसे कार्य करतो’, हे सूत्र शिकायला आणि अनुभवायला मिळते.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.७.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.