थोर कीर्तनकार आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज संभाजी महाराज मोरे यांचे देहू (पुणे) येथे निधन !

ह.भ.प. संभाजी महाराज मोरे देहूकर

देहू (जिल्हा पुणे) – जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज आणि थोर कीर्तनकार, संत साहित्याचे अभ्यासक, संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त, तुकोबारायांचे दहावे वंशज ह.भ.प. संभाजी महाराज मोरे देहूकर यांचे २६ जून या दिवशी देहावसान झाले. त्यांचे वय ७६ वर्षे होते. संभाजी महाराज यांच्या जाण्याने मोरे घराण्याची मोठी हानी झाली आहे. २६ जूनला सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण गावातील नागरिक त्या वेळी उपस्थित होते. ‘त्यांच्या आत्म्यास शांती मिळो’, अशी भावना अनेक वारकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

संभाजी महाराज मोरे देहूकर यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करून कीर्तन, प्रवचन आणि चरित्र कथन या माध्यमांतून तुकोबारायांच्या आध्यात्मिक जीवनकार्याचा प्रचार आणि प्रसार केला आहे.

त्यांनी अनेक वर्षे विनापादत्राणे वारी केली आहे. आषाढी-कार्तिकीच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तन-प्रवचने केली आहेत. संभाजी महाराज यांनी कीर्तनाची परंपरा चालवली. आता त्यांचे चिरंजीव प्रशांत महाराज देहूकर ही परंपरा पुढे नेत आहेत. संभाजी महाराजांच्या कीर्तन सोहळ्याला नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असत.