देशभरातील वास्तूअभ्यासकांच्या लक्षणीय उपस्थितीत वास्तूशास्त्राची कार्यशाळा नगरमध्ये पार पडली !

‘श्रीराम ॲस्ट्रो सेंटर’च्या वतीने राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

नगर – येथील भूतकरवाडीतील ‘श्रीराम ॲस्ट्रो सेंटर’च्या वतीने वास्तूशास्त्राची राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यशाळेत देशभरातील वास्तूअभ्यासकांची लक्षणीय उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय रत्न-ज्योतिष-वास्तू सल्लागार डॉ. जी.ए. रत्नपारखी यांनी केलेले मौलिक मार्गदर्शन अभ्यासकांना प्रभावित करणारे ठरले. उद्योजक प्रवीण उरणकर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

श्रीराम ॲस्ट्रो सेंटरच्या संचालिका सौ. शीतल देशमुख यांनी प्रास्ताविक करतांना वास्तूशास्त्राची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्याची भूमिका सांगितली. या वेळी त्या म्हणाल्या की, वास्तूशास्त्राचा अभ्यास करूनच वास्तू उभारणीची भारतीय परंपरा ऋषिमुनींच्या आश्रम उभारणीपासून चालत आलेली आहे. पिढ्यान्‌पिढ्या ही परंपरा अत्यंत श्रद्धेने जतन करतांना आलेले अनुभवही प्रगतीचे टप्पे पार करणारेच आहेत. वास्तूशास्त्राचा हा अनमोल ठेवा तरुण वास्तूअभ्यासकांच्या हाती सुपुर्द करण्यासाठीच या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना डॉ. जी.ए. रत्नपारखी म्हणाले की, मानवी जीवनाशी भविष्याप्रमाणेच वास्तूचा अतूट संबंध असतो. भूमी आणि भवन जीवन सुखकर बनवत असतात. दिशांचे शुभाशुभत्व आणि प्लॉटकडे येणारे रस्ते पाहूनच प्लॉटची निवड करावी. त्यांनी मुख्य प्रवेशद्वार, उंबरठा, स्वयंपाकघर, देवघर, तिजोरी, स्नानगृह, शौचालय, अडगळीची खोली, जीना, तळघर, भूमी खालील आणि वरील पाण्याची टाकी इत्यादी विषयांची शास्त्रीय माहिती दिली, तसेच उपायशास्त्रही सोदाहरण समजावून दिले. विविध दाखले देत त्यांनी केलेले मौलिक मार्गदर्शन वास्तू उभारणीत वास्तूशास्त्र किती उपयुक्त ठरते, हेच दाखवून देणारे होते.

कार्यशाळेत सहभागी झालेल्या अभ्यासकांना प्रमाणपत्र आणि डॉ. रत्नपारखी यांच्या ‘रत्न-ज्योतिष-वास्तू’ या ग्रंथाची भेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री सुमित अत्रे, मंदार देवळे, सेजल देशमुख प्रभुतींनी विशेष परिश्रम घेतले.