सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर यावल, जिल्हा जळगाव येथील सौ. छाया भोळे आणि श्री. धीरज भोळे यांच्यात अल्पावधीतच झालेला आमूलाग्र पालट !

सौ. छाया भोळे आणि त्यांचे यजमान श्री. धीरज भोळे वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेपासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. साधनेमुळे त्यांच्या जीवनात झालेले पालट पुढे दिले आहेत.

सौ. छाया भोळे

१. साधना करण्यापूर्वीची स्थिती

अ. ‘मी साधनेला आरंभ करण्यापूर्वी माझ्या मनात अनेक नकारात्मक विचार असायचे. एखादा अप्रिय प्रसंग घडला, तर मी सतत त्याच प्रसंगाचा विचार करायचे. त्यामुळे मला पुष्कळ शारीरिक आणि मानसिक त्रास व्हायचे.

आ. मी साधनेत येण्यापूर्वी माझे यजमानही मला त्रास देत असत. त्यामुळे मी त्यांना माझ्या मनातील गोष्टी मनमोकळेपणाने सांगू शकत नव्हते.

२. साधना आरंभ केल्यापासून स्वतः आणि यजमान यांच्यात झालेले पालट

अ. माझ्या मनातील नकारात्मक विचार न्यून झाले आहेत.

आ. माझ्या मनावरील दडपण निघून गेल्यामुळे मला हलकेपणा जाणवतो.

इ. आम्ही दोघे (मी आणि यजमान) साधनेत आल्यापासून यजमानांमध्ये चांगला पालट झाला आहे. आता ते मला समजून घेतात.

ई. आता गुरुकृपेने आमचे जीवन आनंदी झाले आहे. आम्ही दोघेही एकत्रित सेवा करतो. आम्ही एकमेकांना ‘साधनेचे प्रयत्न कसे करायला पाहिजेत ?’, याविषयी सांगतो आणि एकमेकांना स्वतःच्या चुकाही सांगतो.

‘गुरुमाऊलीने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आम्हा पती-पत्नीमध्ये आमूलाग्र पालट करून आमच्या जीवनात आनंद मिळवून दिला. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी अनन्यभावाने कृतज्ञता व्यक्त करते.’